Pune Law College Ragging Case: पुण्याच्या नामांकित लॉ कॉलेजच्या मुलांच्या वसतीगृहात रॅगिंगचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महाविद्यालयील द्वितीय वर्षातील विद्यार्थ्याने याबाबत मानसिक छळ व शिवीगाळ केल्याची तक्रार दिली आहे. याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. टाईम्स ऑफ इंडियाने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.
पुण्यात लॉ कॉलेजमध्ये रॅगिंग
समोर आलेल्या माहितीनुसार, पुण्यातील प्रतिष्ठित विधी महाविद्यालयाच्या वसतिगृहात ३५ वर्षीय विद्यार्थ्याचे रॅगिंग केल्याप्रकरणी पाच विद्यार्थ्यांविरुद्ध डेक्कन जिमखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर २०२४ या कालावधीत हा प्रकार घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, महाविद्यालयाच्या अंतर्गत समितीने यापूर्वीच या प्रकरणाची चौकशी करून रॅगिंग झाले नसल्याचा अहवाल दिला होता, मात्र आता थेट पोलीस तक्रार झाल्याने खळबळ उडाली आहे.
धाराशिव जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या या ३५ वर्षीय विद्यार्थ्याने दिलेल्या तक्रारीनुसार, त्याचे वय जास्त असल्याने विशीतील काही सहकाऱ्यांनी त्याला लक्ष्य केले. वसतिगृहाच्या आवारात त्याच्यावर विनोद करणे, टोमणे मारणे आणि मानसिक छळ करणे असे प्रकार घडले. या वादातून त्यांच्यात अनेकदा शाब्दिक चकमकीही झाल्या होत्या. याप्रकरणी पोलिसांनी महाराष्ट्र रॅगिंग प्रतिबंधक कायदा, १९९९ च्या कलम ३ आणि ४ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
दुसरीकडे, महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी सांगितले की, "२०२४ मध्ये या तक्रारीची दखल घेऊन रॅगिंग विरोधी समितीने चौकशी केली होती. त्याचा अहवाल मार्च २०२५ मध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाला (UGC) सादर करण्यात आला होता, ज्यामध्ये रॅगिंगचे पुरावे आढळले नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. त्यानंतर हे प्रकरण अचानक पोलीस तक्रारीच्या स्वरूपात समोर आले आहे." पोलीस आता या प्रकरणातील विद्यार्थ्यांचे आणि महाविद्यालय प्रशासनाचे जबाब नोंदवणार आहेत.
नक्की वाचा >> HSC Result Update : बारावीचा महाराष्ट्र बोर्डाचा निकाल कधी लागणार? डिजीलॉकरवर मोठी अपडेट, कसा पाहाल निकाल?
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world