रेवती हिंगवे, पुणे:
PMC Abhay Yojana News: पुणेकरांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आहे. पुणे महानगरपालिकेने थकबाकीदार मिळकत धारकांसाठी मोठी सवलत देणारी 'अभय योजना' जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत, पुणेकरांना मिळकत कराच्या दंडाच्या रकमेत तब्बल ७५ टक्के सूट मिळणार आहे. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी ही 'अभय योजना' राबवणार असल्याची माहिती दिली. यावेळी अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी आणि उपायुक्त अविनाश सपकाळ उपस्थित होते.
काय आहे अभय योजना?
पुणे महानगरपालिकेच्या अभय योजनेअंतर्गत मिळकत कराच्या दंडाच्या रकमेवर ७५ टक्के सूट दिली जाईल. मूळ मिळकतकरात कोणतीही सवलत मिळणार नाही, हे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. दंडाची रक्कम कितीही असली तरी ही सवलत लागू असेल. ही योजना येत्या १५ नोव्हेंबर २०२५ पासून सुरू होणार असून १५ जानेवारी २०२६ पर्यंत (दोन महिने) राबवण्यात येणार आहे.
पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 90 लाखांचं घर फक्त 28 लाखात.. कधी, कुठे कराल अर्ज? वाचा...
लाभ कोणाला?
जुन्या हद्दीसह नुकत्याच महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांतील घरगुती आणि व्यावसायिक अशा सर्व प्रकारच्या मिळकतींसाठी ही योजना लागू असणार आहे. या योजनेसाठी ४ लाख ९७ हजार १७२ मिळकत धारक पात्र ठरणार आहेत. त्यांच्याकडून मूळ कराची रक्कम ३ हजार १५८ कोटी रुपये येणे असून दंडाची रक्कम ९ हजार २ कोटी रुपये आहे. सर्वांनी या योजनेचा लाभ घेतल्यास साधारण साडेपाच हजार कोटी रुपये मिळणार आहेत.
महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी स्पष्ट केले आहे की, ज्या मिळकत धारकांनी यापूर्वीच्या 'अभय योजने'चा लाभ घेतला आहे आणि तरीही पुन्हा थकबाकीदार झाले आहेत, अशा सुमारे १ लाख ४० हजार ४३७ मिळकतदारांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. पुणेकरांनी या योजनेचा लाभ घेऊन थकीत मिळकत कर भरून घ्यावा आणि या मोठ्या सवलतीचा फायदा घ्यावा, असे आवाहन पुणे महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे.
Pune Land Scam: 1800 कोटींचा भूखंड घोटाळा! व्यवहार नेमका झाला कसा? खळबळजनक खुलासा