यशपाल सोनकांबळे, पुणे:
Nasrapur Case Verdict : संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणाऱ्या नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणात कोर्टाने महत्त्वाचा निकाल दिला आहे. अवघ्या साडेतीन वर्षाच्या चिमुकलीचे लचके तोडणाऱ्या नराधम भीमराव कांबळेला कोर्टाने अपहरण विनयभंग बलात्कार हत्येच्या मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांच्या न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले होते, त्यानंतर आज कोर्टाने ही शिक्षा सुनावली आहे.
कोर्टाने काय म्हटलं? वाचा संपूर्ण निकाल
निकाल वाचनात कोर्टाने म्हटलं की, दोन्ही पक्षांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने अंतिम निकाल तयार केला आहे. आरोपीचे सर्व सात गुन्हे सिद्ध झाले आहेत. बलात्कार आणि अमानुष खून केल्याप्रकरणी यापूर्वी फाशीची शिक्षा देण्यात आली आहे. एकूण १३७ पानांचे निकाल पत्र आहे. हा खटला साडे तीन वर्षांच्या मुलीच्या लैंगिक अत्याचार आणि हत्येचा आहे. सर्व साक्षीदारांचे साक्षी पुरावे अहवाल आणि युक्तिवाद ऐकल्यानंतर निकाल तयार केलेला आहे.
घटना अत्यंत क्रूर होती. पीडितेला किती क्रूरपणे मारण्यात आले, याचा विचार करून शिक्षा सुनावण्यात येणार आहे. संविधानाच्या चौकटीत जाऊन आणि कायद्याच्या सर्व बाबी तपासल्या आहेत. देशातील यापूर्वीच्या लैंगिक अत्याचारांच्या घटनांमध्ये मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. एखादा गुन्हा शांत डोक्याने केलेला आहे की प्लॅन करून केला आहे, त्यामध्ये देखील फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. बहुतांश खटल्यांमध्ये फाशीची शिक्षा ही कठोर शिक्षा देण्यात आली आहे. त्यामुळे आरोपी मृत्युदंड शिक्षेस पात्र ठरतो, असं कोर्टाने निकालामध्ये म्हटलं आहे.
नेमकं काय घडलं होते?
पुणे जिल्ह्याच्या भोर तालुक्यातील नसरापुर येथे साडेतीन वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करुन हत्या करण्यात आली होती. १ मे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी घडलेल्या या घटनेने राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. पोलिसांनी तात्काळ सुत्रे हलवत नराधम भिमराव कांबळेला अटक केली. अवघ्या महाराष्ट्राला हादरवुन टाकणाऱ्या या प्रकरणाचा फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालला अन् अवघ्या दोन महिन्यात निकाल लागला आहे. सर्वात जलदगतीने निकाल लागलेला हा राज्यातील पहिला खटला ठरला आहे. या प्रकरणी आरोपी भीमराव कांबळे या नराधमाला कोर्टाने आरोपी भीमराव कांबळे याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे.