यशपाल सोनकांबळे, पुणे:
Pune Politics: गेल्या काही दिवसांपासून पुणे काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजी उफाळून आल्याचे पाहायला मिळत आहे. पुणे महानगरपालिकेच्या नुकत्याच झालेल्या स्वीकृत नगरसेवक निवडीवरून आता काँग्रेस पक्षातील अंतर्गत गटबाजी आणि कार्यकर्त्यांचा असंतोष उफाळून आलेला आहे. वरिष्ठ नेते पैसे घेऊन स्वीकृत नगरसेवक पद, तिकिटे आणि कार्यकारिणीतील पदे विकत असल्याचा आरोप काही कार्यकर्त्यांनी केला होता, अशातच आता शहरात झळकलेल्या बॅनरने चर्चांना उधाण आले आहे.
पुण्यातील बॅनरची चर्चा
समोर आलेल्या माहितीनुसार, पुणे शहरामध्ये काँग्रेसमधील नेत्याविरोधात नाराजी दर्शवणारे फ्लेक्स झळकलेत, ज्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. फावड्याशेठ, पांढरे कपडे घातले म्हणून काळा पैसा पांढरा होत नाही, सपकाळांबरोबर फिरलास तरी सज्जन होत नाही, पक्षाला विकून कायम पैसे गोळा केले. सच्चा कार्यकर्त्यांचे वाटोळे केले, आपला फावड्याशेठला माझं नाव माहित आहे, असा मजकूर या बॅनरवर लिहण्यात आला आहे. या फलकावरील नामनिर्देशित केलेला नेता कोण असे खमंग चर्चा पुणे शहरातील राजकीय वर्तुळात रंगली आहे.
रोहित टिळक यांचा पक्षाला रामराम!
दरम्यान, कधीकाळी पुण्यावर सत्ता गाजवणाऱ्या काँग्रेस पक्षाची दयनीय अवस्था पाहायला मिळत आहे. पक्षांतर्गत नाराजी आणि गटबाजीला कंटाळून लोकमान्य टिळकांचे खापरपंतू आणि काँग्रेसचे नेते रोहित टिळक यांनीही आता काँग्रेसला रामराम ठोकला आहे. ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. याआधी माजी आमदार रविंद्र धंगेकर, संग्राम थोपटे यांनीही पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती.