देवा राखुंडे, जेजुरी: अवघ्या महाराष्ट्राच कुलदैवत असलेल्या खंडोबाच्या जेजुरी नगरीला सोन्याची जेजुरी म्हणून ओळखल जाते. देशभरातील भाविक खंडेरायाच्या दर्शनासाठी येत असतात, भंडाऱ्याची उधळण करत असतात. मात्र आता हाच भंडारा भाविकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. ऐतिहासिक जेजुरी गडाला भंडाऱ्यापासून धोका असल्याचा आरोप माजी विश्वस्तांनी केला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अवघ्या महाराष्ट्राच कुलदैवत असलेल्या खंडोबाच्या जेजुरी नगरीला सोन्याची जेजुरी म्हणून ओळखल जाते, ते म्हणजे जेजुरीमध्ये उधळल्या जाणाऱ्या पिवळ्या भंडाऱ्यामुळे. पिवळा भंडारा जेजुरी गडावर आणि जेजुरी नगरीत एवढा उधळला जातो की, या भंडाऱ्यामुळे जेजुरी नगरी अक्षरश: सोन्यासारखी पिवळी होऊन जाते, म्हणूनच जेजुरीला सोन्याची जेजुरी देखील म्हटलं जाते.
मात्र हाच पिवळा भंडारा आता जेजुरीत येणाऱ्या भाविकांच्या आणि स्थानिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरतोय. या भंडाऱ्यामध्ये होत असलेल्या भेसळीमुळे भाविकांचे आरोग्य धोक्यात येत असल्याचा आरोप माजी विश्वस्त शिवराज झगडे यांनी केला आहे. या भंडाऱ्यात होणारी भेसळ रोखावी. अशी मागणी जेजुरी येथील मार्तंड देवसंस्थांचे माजी विश्वस्त शिवराज झगडे यांनी केली आहे. याबाबतचे एक निवेदन त्यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री नरहरी झिरवाळ यांना दिले आहे.
पुर्वीपासून जेजुरीच्या खंडेरायाला भंडारा वापरला जातो. भाविक भक्त आस्थेने भंडाऱ्याची उधळण करतात. मात्र गेल्या काही वर्षांपासून यामध्ये भेसळ केली जात आहे. याबाबत मंदिरातील पुजारी, खांदेकऱ्यांनी प्रशासनाकडे तक्रार केली होती. मंदिर परिसरात टर्मरिक पावडर, भंडारा पावडर, नॉन इटेबल असे शिक्के मारलेले असतानाही विक्री केली जाते.
या भंडाऱ्यामुळे भाविकांच्या आरोग्यावर परिणाम होतो. डोळ्यांना त्रास होतो, डोळे चुरचुरणे, खाज सुटणे, अंगावर वण उटणे, काळे डाग उटणे असे धोके उद्भवतात. महत्त्वाचं म्हणजे या भंडाऱ्यामुळे ऐतिहासिक दगडांवर परिणाम होत असून यावर बंदी घालावी असा अहवाल पुरातत्व विभागानेही दिल्याची माहिती विश्वराज झगडेंनी दिली आहे. यावर आता प्रशासन काय निर्णय घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Cabinet Meeting : राज्यात ई-बाईक टॅक्सीला मंजुरी, प्रवास होणार स्वस्त; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय