
देवा राखुंडे, जेजुरी: महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या खंडोबा देवाच्या दर्शनासाठी जेजुरी गडावर येणाऱ्या भाविकांसाठी आजपासून वस्त्र संहिता लागू करण्याचा सर्वात मोठा निर्णय देवस्थान ट्रस्टने घेतला आहे. भारतीय वेशभूषा असेल तरच भाविकांना प्रवेश मिळेल असे श्री मार्तंड देव संस्थान, जेजुरीच्या विश्वस्त मंडळाच्या वतीने सांगण्यात आले असून यासंंबंधीची नियमावलीही जाहीर करण्यात आली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
जेजुरी हे महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी आहे. महाराष्ट्रासह कर्नाटक, गोव्यामधून लाखो भाविक जेजुरीच्या खंडेरायाचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. लग्नसराईनंतर जेजुरीच्या खंडेरायाचे दर्शन घ्यावे, अशी आस्था महाराष्ट्रामध्ये आहेत. तसेच जेजुरीत चंपासष्टीला मोठी यात्राही भरते. अशातच आता जेजुरीमध्ये खंडेरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी मंदिर समितीने ड्रेस कोड लागू करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
यापुढे मंदिरात दर्शनासाठी भारतीय वेशभूषा परिधान करणे आवश्यक असेल. भारतीय वेशभूषा असेल तरच भाविकांना प्रवेश मिळेल असा निर्णय श्री मार्तंड देव संस्थान, जेजुरीच्या विश्वस्त मंडळाच्या वतीने घेण्यात आला आहे. तसेच त्यासाठी नियमावलीही जाहीर करण्यात आली आहे. पुरूष व महिला भाविकांना मंदिरांत कमी कपड्यांमध्ये प्रवेश मिळणार नाही असंही स्पष्ट करण्यात आले आहे.
फॅशन म्हणून वापरण्यात येणाऱ्या फाटक्या जीन्स, बरमुडा, शॉर्ट, स्कर्ट असा व तत्सम कपडे घालून देव दर्शनास गडावर येण्यास मज्जाव केला जाणार आहे. गुडघ्याच्या वरती असणारे किंवा आखूड- कमी कपडे अपेक्षित नाहीत. असे कपडे न घालण्याचं नम्र आवाहन सर्व विश्वस्त मंडळाच्या वतीने भाविकांना करण्यात आले आहे. महिला आणि पुरुष दोघांसाठी हे नियम सारखेच असणार आहेत. दरम्यान दर्शनासाठी येताना भाविकांनी कोणत्याही प्रकारचे भारतीय पारंपरिक वेशभूषा केलेली चालणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world