अजिंक्य धायगुडे पाटील, पुणे:
Pune News: शासकीय आरोग्य यंत्रणा कशा पद्धतीने रुग्णांच्या जीवाशी खेळतात याचाच दाखला देणारी धक्कादायक प्रकरण पुण्यामधून समोर आले आहे. पुणे जिल्ह्यात एकाच दिवशी एका डॉक्टरने कुटुंबनियोजनाच्या तब्बल ९७ शस्त्रक्रिया केल्याचे उघडकीस आले आहे. घाईघाईने शस्त्रक्रिया करण्याच्या प्रयत्नात एका महिलेचा मृत्यू झाल्यानंतर हा प्रकार समोर आला.
एकाच दिवसात डॉक्टरकडून 97 शस्त्रक्रिया
दौंड तालुक्यातील खोर येथील एका विवाहित महिलेचा कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेनंतर अतिरक्तस्राव होऊन मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रंजना बाबू केसकर असं मृत्यू झालेल्या बावीस वर्षीय महिलेचे नाव आहे.या घटनेने आरोग्य यंत्रणेच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रंजना केसकर यांची कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केडगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात झाली. शस्त्रक्रियेनंतर पोटात रक्तस्त्राव होत राहिल्याने केसकर यांच्या मृत्यू झाला. अतिघाईमुळे ही दुर्घटना घडली अशी प्राथमिक माहिती आहे. घाई घाईमध्ये अनावश्यक नस कापली गेली. तो रक्तस्त्राव बंद न करता ऑपरेशन बंद करण्यात आले. कारण पुढे शस्त्रक्रियेसाठी पुढच्या गावात जायचे होते.
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मृत महिलेच्या कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले. हाके यांनी आरोग्य प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. एका दिवसात तब्बल 97 कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्या गेल्या, हा प्रकार अत्यंत धक्कादायक आहे. अशा परिस्थितीत प्रशासनाचा सत्कार करावा की चौकशी करावी, असा प्रश्न आम्हाला पडला आहे. अस हाके यांनी म्हटले आहे.
आरोग्याशी खेळ
पुणे जिल्ह्यात ११० प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत मात्र सर्जन मिळत नाहीत अशी तक्रार आहे. प्रशासनाने यातून मार्ग काढला पाहिजे. पुणे जिल्ह्यात एकही सर्जन नाही. डॅा. अनिल कदम गेली दोन वर्ष साता-यातून येऊन अशा 'होलसेल सर्जरी' करत आहेत. वास्तविक पाहता काहीही सुविधा नसणा-या प्राथमिक आरोग्य केंद्रात अशा सर्जरी न करता त्या ग्रामीण रूग्णालयात केल्या पाहिजेत. असे या क्षेत्रातील तज्ञांचे मत आहे. पण सगळ्यांना टार्गेट पुरे करायचे असते. त्यामुळे आतला आवाज बाहेर येत नाही. खासगी दवाखान्यातील भरमसाठ खर्च गरीबांना झेपत नाही. सरकारी दवाखान्यावरील विश्वास टिकून ठेवायचा असेल तर लोकप्रतिनिधी व प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
Palghar Accident: अनर्थ टळला! भाजप खासदाराच्या गाडीचा भीषण अपघात, डंपरची धडक; चालक जखमी
- -जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र ११०.
- -दिवसात २५ शस्त्रक्रिया करण्याचा नियम.
- - प्राथमिक आरोग्य केंद्रात फक्त सहा बेड.
- - एका सिझरचे सर्जनला मिळतात १०० रू.
- - सर्जन कदम यांचे कार्यक्षेत्र सातारा, सांगली, पुणे.
२५ एप्रिलला आरोग्य केंद्र निहाय शस्त्रक्रिया
- केडगाव - १९
- नानगाव - १३
- वरवंड - २०
- रावणगाव - १९
- कुरकुंभ - २६
- प्राथमिक केंद्रांमधील अंतर अंदाजे ७० किलोमीटर.
- सातारा ते केडगाव अंतर १०५ किलोमीटर.