अजिंक्य धायगुडे पाटील, पुणे:
Pune Fuel Storage News: पुणे शहरामध्ये पेट्रोल डिझेल टंचाईच्या अफवा पसरल्याने नागरिकांनी पेट्रोल पंपांवर मोठी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. पेट्रोल पंपांवर लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत असून नागरिकांचे हाल होत आहेत. मात्र या संपूर्ण परिस्थितीवर पेट्रोल डीलर्स असोसिएशनने पुणेकरांना सर्वात महत्त्वाचे आवाहन केले आहे. तेल कंपन्यांकडून सुरळीत पुरवठा सुरु असून पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे.
पुणे पेट्रोल डिझेल असोसिएशनने आवाहन..
पुणे पेट्रोल, डीलर्स असोसिएशनने सर्व नागरिकांना शांतता राखण्याचे आणि पेट्रोल व डिझेलसाठी घाबरून गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे. तेल कंपन्यांकडून इंधनाचा पुरवठा सध्या पूर्णपणे सुरळीत सुरू आहे. पुणे आणि आसपासच्या भागात इंधनाची कोणतीही कमतरता नाही. सर्व पेट्रोल पंपांवर नियमितपणे इंधन उपलब्ध करून दिले जात आहे आणि पुरवठा साखळी व्यवस्थित कार्यरत आहे, असं पेट्रोल असोसिएशनने म्हटलं आहे.
Pune News: पुण्यात 5 नवीन पोलीस स्टेशन्सना मंजुरी; कोणत्या परिसराला होणार फायदा? पाहा यादी
सध्या घाबरून इंधन खरेदी करण्याच्या प्रवृत्तीमुळे मागणीत अनावश्यक वाढ होत आहे. अचानक वाढलेल्या मागणीमुळे वितरण व्यवस्थेवर ताण येत असून, नागरिकांना तात्पुरती गैरसोय होऊ शकते. त्यामुळे अनावश्यक साठा करू नये, केवळ नेहमीच्या गरजेनुसारच इंधन खरेदी करावे तसेच पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांशी सहकार्य करावे आणि शिस्त पाळावी, असंही पेट्रोल डिझेल असोसिएशनने म्हटलं आहे.
संभाजीनगरमध्ये रिक्षा चालक आक्रमक
दरम्यान, राज्यभरात पेट्रोल- डिझेलसह गॅसचा तुटवडा जाणवत असल्याचे चित्र पाहायला मिळत असून नागरिकांची चिंता वाढली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅससाठी रिक्षा चालक आक्रमक झाले असून गॅस मिळत नसल्याने रिक्षा चालकांनी जालना महामार्ग बंद केला. दोन दिवसांपासून एलपीजी गॅस मिळत नसल्याने हे रिक्षा चालक आक्रमक झाले. गॅस चालकांनी आक्रमक होत रास्ता रोको सुरू केला आणि चिखलठाणा येथील जालना महामार्ग बंद केला.