Pune News: पैशासाठी मारामारी, खून, दरोडे, लुटमारीच्या घटना वारंवार घडत असतात. पैशासाठी, संपत्तीसाठी रक्तातीच नाती जिवावर उठल्याच्याही अनेक घटना घडतात. सर्वत्र अशा समाज दुभंगणाऱ्या घटना घडत असताना आजही माणुसकी जपणारी, माणुसकीला जागणारी माणसंही या जगात आहेत, याचाच प्रत्यय पुण्यातील एका घटनेने आला आहे.
पुणे शहरात कचरा वेचणाऱ्या एका महिलेला तब्बल 10 लाखांची रोकड असलेली बॅग सापडली. 10 लाख रुपये म्हणजे एका सामन्यासाठी मोठी रक्कम. मात्र या सापडलेल्या पैशाचा जराही मोह न करता या महिलेने बॅग मालकाचा शोध घेत त्याचे पैसे त्याला परत केले. सोशल मीडियावर या महिलेचे प्रचंड कौतुक होत असून तिच्या माणुसकीला आणि प्रामणिकपणाला अनेकांनी सलाम केला आहे.
Pune Crime: परदेशी महिला, हॉटेलमध्ये नको ते धंदे... पुणे पोलिसांनी केला पर्दाफाश
समोर आलेल्या माहितीनुसार, अंजू माने असं या प्रामणिक स्वच्छता सेविकेचे नाव आहे. अंजु माने गेल्या वीस वर्षांपासून पुण्यातील सदाशिव पेठ भागात स्वच्छतेचे काम करतात. दोन दिवसांपूर्वी नेहमीप्रमाणे कचरा वेचत असताना त्यांना एक बॅग सापडली. परिसरात हॉस्पिटल असल्याने एखाद्याची औषधे त्यात असतील असा समज करुन त्यांनी ती बॅग आपल्याजवळ ठेवली.
काही वेळानंतर त्यांनी ती बॅग उघडून पाहिली असता त्यामध्ये तब्बल 10 लाख रुपये असल्याचं समजले. इतकी मोठी रक्कम सापडल्याने त्यांनाही धक्का बसला. त्यांनी ओळखीच्या माणसांना संपर्क करत बॅग मालकाचा शोध सुरु केला. अशातच परिसरात अतिशय अस्वस्थपणे काहीतरी शोधत फिरत असलेली व्यक्ती त्यांना दिसली.
त्या व्यक्तीची १० लाख रुपये असलेली बॅग हरवल्याचे समजले. इतकी मोठी रक्कम गमावल्याने ती व्यक्ती घाबरुन गेली होती, त्यांना बोलताही येत नव्हते. अंजु माने यांनी त्या व्यक्तीला पाणी देऊन शांत करण्याचा प्रयत्न केला. सापडलेली बॅग त्यांचीच असल्याचे निश्चित करून दहा लाख रक्कम केली. त्यांच्या या प्रामणिकपणाबद्दल स्थानिकांनी साडीसह रोख रक्कम देत त्यांचा सत्कारही केला.