यशपाल सोनकांबळे, पुणे:
Pune Z Bridge Closed: पुणेकरांसाठी महत्त्वाची अन् मोठी बातमी समोर आली आहे. पुणे शहरातील अत्यंत वर्दळीचा असलेला डेक्कन परिसराला पेठेशी जोडणारा कै. काकासाहेब गाडगीळ पूल (झेड ब्रिज) दुरुस्तीमुळे एक महिना बंद राहणार आहे. पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. तसेच नागरिकांना पर्यायी मार्ग वापरण्याचे आवाहन केले आहे.
पुण्यातील महत्त्वाचा पूल बंद!
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुणे शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला कै. काकासाहेब गाडगीळ पूल, जो 'झेड ब्रिज' म्हणून ओळखला जातो, तो दुरुस्तीच्या कामासाठी १० एप्रिलपासून अंशतः बंद ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. ९ मे पर्यंत चालणाऱ्या या कामामुळे रात्रीच्या वेळी पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे.
स्ट्रक्चरल ऑडिटनंतर दुरुस्तीचा निर्णय
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या आदेशानुसार, गेल्या वर्षी पावसाळ्यानंतर पुणे महानगरपालिका हद्दीतील सर्व उड्डाणपुलांचे 'स्ट्रक्चरल ऑडिट' करण्यात आले होते. या तपासणीनंतर १७ पुलांची तातडीने दुरुस्ती करणे आवश्यक असल्याचे समोर आले होते. पहिल्या टप्प्यात खडकवासला, संभाजी आणि दांडेकर पुलांची कामे यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतर, आता दुसऱ्या टप्प्यात झेड ब्रिजचे काम हाती घेण्यात आले आहे.
रात्रीचीच वेळ का?
"पुलाचे एक्स्पान्शन जॉइंट्स आणि बेअरिंग बदलण्याचे काम अत्यंत महत्त्वाचे आहे. दिवसा या पुलावर मोठी रहदारी असते, त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा टाळण्यासाठी आम्ही रात्री ११ ते सकाळी ७ ही वेळ निवडली आहे," अशी माहिती महापालिकेचे प्रकल्प विभागप्रमुख दिनकर गोजारे यांनी दिली. दिवसा हा पूल वाहतुकीसाठी खुला राहणार असल्याने नोकरदार वर्गाला मोठा दिलासा मिळणार आहे.