Pune Police Umarti combing operation: पुणे शहरातील गुन्हेगारीचा रक्तरंजित इतिहास दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. पुण्यातील हा रक्तगाथेमागे मध्यप्रदेशातील उमरटी हे गाव केंद्रस्थानी असल्याचं समोर आले आहे. मेक इन यूएसए म्हणजेच उमरटी शिकलगार आर्म्समधून घेतलेली शस्त्रे पुण्यात वापरली जात असल्याचं समोर आले असून पुणे आणि मध्यप्रदेश पोलिसांनी संयुक्त कारवाई करत हे रॅकेट उद्ध्वस्त केले आहे.
पुणे पोलिसांची सर्वात मोठी कारवाई!
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुणे पोलीस आणि मध्यप्रदेश पोलिसांनी एकत्रित कारवाई करत मध्य प्रदेशातल्या उमर्टी गावात कोबिंग ऑपरेशन केले. या ऑपरेशनमध्ये 50 कारखाने उध्वस्त करण्यात आले असून शेकडो बंदूका जप्त करण्यात आल्या आहेत. उमर्टी गावातील कारखान्यांवर पुणे पोलिसांच्या पथकाने छापा टाकून 50 भट्टया उद्ध्वस्त केल्या.
पुणे पोलिस दलातील १५० पोलिस अधिकारी आणि कर्मचारी या कारवाईत सहभागी होते. डीसीपी सोमय मुंडे यांनी या मोहिमेचे नेतृत्व केले. या कारवाईत ४७ जणांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यापैकी 10 जणांना अटक करण्यात आली आहे. शनिवारी 22 नोव्हेंबर 2025 च्या पहाटे ही धडाकेबाज कारवाई करण्यात आली.
महाराष्ट्रासह तीन राज्यांमध्ये याच गावातून शस्त्र पुरवठा होत होता. ही हत्यार पुरवणारी साखळी आहे ज्यांनी पुण्यात हे हत्यार पाठवले आहेत याचा शोध सुरू आहे, अनेक लोक या रॅकेट मध्ये सहभागी आहेत सगळ्यांवर गुन्हे नोंद करण्यात येईल सगळ्यांना आरोपी करण्यात येईल, असं आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले आहे.
महाराष्ट्र, गुजरातला शस्त्रपुरवठा!
मध्य प्रदेशातील बडवणी जिल्ह्यामध्ये दुर्गम भागात हे गाव आहे. याच गावातून पुण्यासह महाराष्ट्र, गुजरात, छत्तीसगड भागात ७०० ते ८०० शस्त्रे पुरवण्यात आले होती. गुंड शरद मोहोळ, माजी नगरसेवक - वनराज आंदेकरच्या खून प्रकरणात मागील ५ वर्षांत झालेल्या कारवायांमध्ये मध्य प्रदेशमधील उमर्टी गावात बनवण्यात येणाऱ्या - गावठी पिस्तुलांचा वापर करण्यात आला असल्याचेही आता उघडकीस आले आहे.