रेवती हिंगवे, पुणे: पुण्यातील स्वारगेट बसस्थानक परिसरात शिवशाही बसमध्ये अत्याचार झाल्याची संतापजनक घटना घडली. याप्रकरणी आरोपी दत्तात्रय गाडे याला अटक करण्यात आली असून तो सध्या पोलीस कोठडीत आहे. अशातच या प्रकरणात आता सर्वात धक्कादायक अपडेट समोर आली असून याप्रकरणातील पीडित तरुणीने राज्याच्या प्रधान सचिवांना पत्र पाठवले आहे ज्यामध्ये पुणे पोलिसांवर गंभीर आरोप करण्यात आलेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे पिडीत तरुणीचे पत्र?
मी पुण्यातील स्वारगेट येथे झालेल्या बलात्कार घटनेतील विक्टिम आहे. दिनांक 25-2-2025 रोजी स्वारगेट बस स्थानकातील शिवशाही बसमध्ये आरोपी दत्ता गाडे नावाच्या व्यक्तीने बलात्कार केला. मी सुरुवातीला आरडाओरडा केला त्यानंतर माझा आवाज खोल गेला, माझा आवाज निघत नव्हता. त्याचवेळी माझ्या मनात बलात्काराच्या विविध घटनांमध्ये विरोध केल्याने मुलींना मारुन टाकल्याच्या गोष्टी मनात आल्या, मी जीव वाचवणे महत्त्वाचे मानले, असे पिडीतेने या पत्रामध्ये म्हटले आहे.
तसेच आरोपी दत्ता गाडे याने दोनदा माझ्यावर बलात्कार केल्यानंतर तिसऱ्यांदा त्याने पार्श्वभागाकडून लैंगिक जबरदस्तीचा प्रयत्न केला. तेव्हा मी पूर्ण ताकदीने विरोध केला होता, कदाचित दोनदा लैंगिक अत्याचार केल्याने त्याने सुद्धा माघार घेतली आणि तो पळून गेला, असेही पिडीतेने या पत्रामध्ये म्हटले आहे.
या पत्रामध्ये तिने पुणे पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. पुणे पोलिसांकडून मला सांगण्यात आले होते की तुला तीन वकिलांचे नावे आम्ही सुचवू आणि त्यातून तुझ्या पसंतीचे वकील आम्ही नेमू. मी असीम सरोदे यांची नेमणूक करावी अशी मागणी केली असता, तुला यायला एक दिवस उशीर झाला असं पुणे पोलिसांकडून मला सांगण्यात आले, म्हणजे अन्यायग्रस्त मुलगी म्हणून माझ्या म्हणण्याला काहीच महत्त्व नाही असा कायदा आहे का? असा सवाल तिने उपस्थित केला आहे.
तसेच पुरुष वैद्यकीय अधिकाऱ्यांनी माझी इच्छा नसताना माझी संमती घ्यायची व स्वतः माझी वैद्यकीय चाचणी करायची. अनेक पुरुष पोलीस अधिकाऱ्यांना मी माझ्यावर कसा अत्याचार करण्यात आला ते सांगायचे. माझ्या चारित्र्यावर चिखल उडवणारे वक्तव्य आरोपीच्या प्रतिनिधींनी, नेत्यांनी करायची. माझ्या निवडीनुसार वकील निवडण्याचे अधिकारही नाहीत अशी वागणूक दिली जात आहे असा आरोप करत माझ्या केसमध्ये सरकारी वकील म्हणून असीम सरोदे यांची नियुक्ती करण्याची मागणी तरुणीने केली आहे.