मेहबूब जमादार, प्रतिनिधी
Rahul Narwekar Farmer Dispute Video: अलिबाग तालुक्यातील म्हात्रोळी गावामध्ये सध्या एका व्हायरल व्हिडिओमुळे मोठी खळबळ उडाली आहे. या व्हिडिओमध्ये राज्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि स्थानिक शेतकरी यांच्यात बाचाबाची झाल्याचे दिसत असून, शेतकऱ्यांनी नार्वेकर यांना तिथून जाण्यास भाग पाडल्याचा दावा केला जात आहे.
शुक्रवारी (13 फेब्रुवारी 2026) रोजी घडलेल्या या घटनेने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली असून, सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. मांडावा रोडवरील सारळ जवळ असलेल्या म्हात्रोळी गावात ही घटना घडली असून यामुळे अलिबागमध्ये तणावाचे वातावरण पाहायला मिळाले.
काय आहे प्रकरण?
मिळालेल्या माहितीनुसार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे काही कर्मचारी वर्गाला सोबत घेऊन एका शेतकऱ्याच्या जागेची मोजणी करण्यासाठी गेले होते. यावेळी संबंधित शेतकरी कुटुंबाने तिथे येण्यास तीव्र विरोध दर्शवला. स्थानिक शेतकऱ्यांच्या मते, राहुल नार्वेकर आणि त्यांच्या सोबत असलेल्या कर्मचाऱ्यांना तिथून बाहेर जाण्यास वारंवार सांगण्यात आले.
तरीही नार्वेकर यांनी तिथे थांबण्याचा प्रयत्न केला असता, संतप्त झालेल्या शेतकरी कुटुंबाने त्यांना तिथून अक्षरशः पळवून लावल्याचा दावा केला जात आहे. नार्वेकर यांनी परिस्थिती हाताळण्याचा आणि शेतकऱ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु स्थानिक कुटुंबीय काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते.
( नक्की वाचा : Pune News : पुणेकरांनो सुटका झाली, हिंजवडी मेट्रो धावली! 23 किलोमीटर प्रवासातील सर्व स्टेशन्स कोणती? पहा VIDEO )
संजय राऊत यांनी शेअर केला व्हिडिओ
या प्रकरणाला राजकीय वळण तेव्हा लागले जेव्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर शेअर केला. राऊत यांनी आपल्या पोस्टमध्ये थेट प्रश्न विचारले की, विधानसभा अध्यक्षांसोबत ही हाणामारी कोठे आणि का झाली? राहुल नार्वेकर यांनी तिथून पळ काढला आहे, हे तुम्ही सांगताय की मी सांगू? अशा शब्दांत त्यांनी टीका केली.
संजय राऊत यांनी या ट्विटमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान कार्यालयाला देखील टॅग केले होते, ज्यामुळे या वादाची चर्चा दिल्लीपर्यंत पोहोचली आहे.
राहुल नार्वेकर यांनी दिले स्पष्टीकरण
या सर्व प्रकरणावर आता स्वतः राहुल नार्वेकर यांनी समोर येत आपली बाजू मांडली आहे. त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, ज्या ठिकाणी ही घटना घडली, तिथून ते केवळ जात होते. तिथे काही लोक सरकारी अधिकाऱ्यांना मारहाण करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. माणुसकीच्या नात्याने आणि एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून ते तिथे थांबले आणि त्यांनी अधिकाऱ्यांना मारहाण करू नका अशी विनंती केली. नार्वेकर यांनी स्पष्ट केले की, त्या ठिकाणी त्यांची कोणतीही जमीन नाही आणि त्यांना तिथे जमीन घ्यायचीही नाही. कोणत्याही पुराव्याशिवाय आपल्यावर बिनबुडाचे आरोप केले जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.