मान्सून राज्यात सर्वदूर सक्रीय झाला आहे. अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे. आज दक्षिण कोकणात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आहे. उत्तर कोकणातील जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
पूर्व विदर्भात पावसाचा अंदाज
विदर्भात शनिवार संपूर्ण विदर्भात ढगाळ वातावरणाचा अंदाज आहे. पूर्व विदर्भात सर्वत्र पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. नागपूर, वर्धा, अमरावती, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यामध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी जोरदार वारा आणि विजांच्या कडकडाटाची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आली आहे. उर्वरित विदर्भासाठी पावसाचा कुठलाही अलर्ट जारी करण्यात आलेला नाही.
मुंबईत कसा असेल पाऊस?
मुंबईतील अनेक भागांत शुक्रवारी पावसाची संततधार सुरु होती. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार शहर आणि उपनगरांमध्ये आज ढगाळ वातावरण राहील. अनेक भागांत रिमझिम पावसाची शक्यता आहे.
मच्छिमारांना आवाहन
उत्तर महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत आणि परिसरात वादळी हवामान 35 ते 45 किमी प्रतितास वेगाने वाऱ्यासह 55 ते 55 किमी प्रतितास वेगाने वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या काळात मच्छीमारांनी उत्तर महाराष्ट्र किनारपट्टीवर आणि त्याच्या बाहेर जाऊ नये, असा सल्ला देण्यात आला आहे.