Ram Navami Rally: खळबळजनक! श्रीरामपूरमध्ये राम नवमीच्या मिरवणुकीवर दगडफेक, मौलानांसह 12 जणांवर गुन्हा

Shrirampur Ram Navami Stone Pelting: अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात रामनवमीच्या उत्सवाला दगडफेकीचे गालबोट लागले आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
Ram Navami Tension Shrirampur : या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला
श्रीरामपूर:

सुनील दवंगे, प्रतिनिधी

Shrirampur Ram Navami Stone Pelting: अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात रामनवमीच्या उत्सवाला दगडफेकीचे गालबोट लागले आहे. गोंधवणी परिसरातून श्रीराम मंदिराच्या दिशेने निघालेल्या भव्य शोभायात्रेवर अचानक दगडफेक झाल्याने एकच खळबळ उडाली. सय्यद बाबा चौकातील दर्गा परिसरात ही घटना घडली असून, यामध्ये दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत. 

या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला असून पोलिसांनी तातडीने धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. सध्या श्रीरामपूरमध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून शहरात तणावपूर्ण शांतता आहे.

Advertisement

नेमकी कशी झाली दगडफेक?

मिळालेल्या माहितीनुसार, श्रीरामपूरमधील गोंधवणी येथून रामनवमीनिमित्त पारंपरिक शोभायात्रा काढण्यात आली होती. ही मिरवणूक उत्साहात श्रीराम मंदिराकडे जात असताना सय्यद बाबा चौकातील दर्गा परिसरात पोहोचली. याच वेळी अचानक मिरवणुकीच्या दिशेने दगड येण्यास सुरुवात झाली. 

यामुळे मिरवणुकीत सहभागी असलेल्या भाविकांमध्ये मोठी धावपळ उडाली. या हल्ल्यात दोन तरुण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, सय्यद चौकातील काही स्थानिकांनी दावा केला आहे की, आधी मिरवणुकीतून दगडफेक करण्यात आली होती. या परस्परविरोधी दाव्यांमुळे तणाव अधिकच वाढला.

( नक्की वाचा : Ram Navami Rally: नालासोपाऱ्यात ठिणगी! रामनवमी रॅलीत पोलीस-भाविकांमध्ये झटापट, नेमकं काय घडलं? )

मौलाना आणि 12 जणांविरोधात गुन्हा दाखल

या घटनेप्रकरणी सुयोग झिरांगे यांनी श्रीरामपूर पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी मस्जिदमधील मौलाना आणि इतर 10 ते 12 अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी घटनेचा पंचनामा सुरू केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दगडफेक करणाऱ्यांचा शोध घेतला जात आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी स्वतः श्रीरामपूरमध्ये तळ ठोकून आहेत.

अहिल्यानगरमध्ये आमदार संग्राम जगतापांचा रांगडा अवतार

जिल्ह्यात एका बाजूला श्रीरामपूरमध्ये तणावाचे वातावरण असताना, दुसरीकडे अहिल्यानगर शहरात मात्र राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित रामनवमी मिरवणुकीत आमदार जगताप यांनी चक्क 'अफजल खान वध' आणि 'गर्व से कहो हम हिंदू हैं' असे पोस्टर्स झळकवले. मिरवणूक कोतवाली पोलीस ठाण्याच्या चौकात येताच कार्यकर्त्यांनी त्यांना खांद्यावर उचलून घेतले आणि आमदारांनी भगवा पंचा फिरवत, दंड थोपटत जोरदार नृत्य केले.

Advertisement

तब्बल 10 वर्षांनंतर पारंपरिक मार्गावरून मिरवणूक

अहिल्यानगर शहरात यंदाची रामनवमी विशेष ठरली, कारण तब्बल 10 वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर ही मिरवणूक पुन्हा एकदा पारंपरिक मार्गाने काढण्यात आली. हजारोंच्या संख्येने तरुण या मिरवणुकीत सहभागी झाले होते. आमदारांच्या आक्रमक पवित्र्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. प्रशासनाने या मिरवणुकीसाठी ड्रोन आणि सीसीटीव्हीच्या माध्यमातून चोख बंदोबस्त ठेवला होता, जेणेकरून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये.

शांतता राखण्याचे प्रशासनाचे आवाहन

श्रीरामपूरमधील दगडफेकीच्या घटनेनंतर पोलिसांनी नागरिकांना शांततेचे आवाहन केले आहे. सोशल मीडियावर कोणतीही आक्षेपार्ह पोस्ट किंवा अफवा पसरवू नका, असा इशारा देण्यात आला आहे. श्रीरामपूरमधील संवेदनशील भागात सध्या राज्य राखीव दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या असून, परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
 

Advertisement
Topics mentioned in this article