मनोज सातवी, प्रतिनिधी
Ram Navami Rally Tension in Nalasopara: नालासोपाऱ्यात रामनवमीनिमित्त काढण्यात आलेल्या भव्य रॅलीदरम्यान पोलीस आणि आयोजकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. वाद इतका विकोपाला गेला की, पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप भाविकांनी केला असून संतप्त रामभक्तांनी भररस्त्यात ठिय्या मांडला. या घटनेमुळं परिसरात काही काळ भीतीचं आणि गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं.
नेमकं काय घडलं?
नालासोपारा पूर्व भागातील ओसवाल नगरी सर्कल येथून रामनवमीनिमित्त मोठी शोभायात्रा काढण्यात आली होती. ही रॅली उत्साहात रहमत नगर परिसराकडे जात होती. मात्र, ही यात्रा एका विशिष्ट गल्लीतून जात असताना पोलिसांनी रॅलीच्या मार्गाबाबत आक्षेप घेतला आणि रॅली काही काळ रोखून धरली. रॅली पुढं नेण्यावरून पोलीस अधिकारी आणि आयोजकांमध्ये बाचाबाची सुरू झाली. पाहता पाहता या वादाचं रूपांतर धक्काबुक्की आणि राड्यात झालं.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार,आयोजक आणि पोलीस समोरासमोर आले, तेव्हा परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली. गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप आयोजक आणि उपस्थित भाविकांनी केला आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळं शोभायात्रेत आलेल्या भाविकांमध्ये मोठी धावपळ उडाली. या प्रकारामुळं संतापलेल्या भाविकांनी रस्त्यावरच बसून प्रशासनाचा निषेध केला आणि जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला होता.
( नक्की वाचा : Dombivli News: डोंबिवलीतील प्रसिद्ध शाळेच्या ट्रस्टीच्या मुलाकडून शिक्षिकेकडे शरीरसुखाची मागणी;शहरात संताप )
नालासोपाऱ्यात छावणीचं स्वरूप
या घटनेची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरली आणि तणाव अधिकच वाढला. परिस्थिती आणखी बिघडू नये यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने अतिरिक्त कुमक मागवली.

सध्या नालासोपाऱ्यातील संबंधित परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिसराला एका अर्थाने छावणीचं स्वरूप प्राप्त झालं आहे. पोलिसांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन नागरिकांना केलं असून, परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
( नक्की वाचा : प्रोफेसरनं विद्यार्थिनीला क्लासमध्येच केलं प्रपोज,संतापलेल्या विद्यार्थ्यांनी कॅम्पसमध्येच धु धु धुतलं, VIDEO )
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world