विशाल पाटील, प्रतिनिधी
Operation Tiger: शिवसेना ठाकरे गटा 6 खासदार फुटल्याच्या धक्क्यातून अद्याप सावरलेला नाही. तोच आता सत्ताधारी शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी एक अत्यंत खळबळजनक आणि थेट दावा केला आहे. ठाकरे गटाचा सातवा खासदारही फुटला असून त्याने तर थेट मंत्रिपदाची मागणी केली होती, असा सनसनाटी खुलासा कदम यांनी केला आहे. उद्धवजी, तुमच्या आजूबाजूचे लोकच तुम्हाला फसवून संपवत आहेत, असा थेट इशारा देतानाच रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर अत्यंत टोकदार शब्दांत प्रहार केला आहे.
सातव्या खासदाराने मागितले होते मंत्रिपद
रामदास कदम यांनी ठाकरे गटाच्या अंतर्गत घडामोडींवरून थेट हल्ला चढवला आहे. उद्धवजी, अजूनही वेळ गेलेली नाही, तुमचे लोक तुम्हाला अंधारात ठेवत आहेत, असे सांगत कदम म्हणाले की, सातव्या खासदाराची देखील स्वाक्षरी झाली आहे. हा खासदार तर थेट मंत्रिपद मागत होता आणि तो तुमच्याच बाजूला बसत होता.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे नेहमी सर्वांच्या बैठका घ्यायचे, प्रत्येकाचे मत जाणून घ्यायचे आणि मग निर्णय घ्यायचे. मात्र उद्धव ठाकरेंनी कधी बैठका घेतल्याच नाहीत. केवळ आदित्य ठाकरेंसाठी त्यांनी पक्षाची वाट लावून घेतली, असा थेट आरोप कदम यांनी केला आहे.
( नक्की वाचा : Sanjay Raut: संजय राऊतांच्या 'ऑपरेशन तुडवा'ला शिंदेच्या शिलेदाराचे आव्हान; सुरक्षेसाठी शिवसैनिक बनणार ढाल )
एकनाथ शिंदेच खरे टायगर
शिवसेनेच्या 60 व्या वर्धापनदिनाचा संदर्भ देत रामदास कदम यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला आणि सद्यस्थितीवर बोट ठेवले. बाळासाहेब ठाकरेंनी कधीही स्वतःसाठी कोणतेही शासकीय पद घेतले नाही, तर इतर कार्यकर्त्यांना मुख्यमंत्री आणि मोठी पदे देऊन त्यांचा सन्मान केला. मात्र उद्धव ठाकरेंनी स्वतः मुख्यमंत्री होण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाऊन बाळासाहेबांचे विचार बुडवले. एकनाथ शिंदे यांचे कौतुक करताना कदम म्हणाले की, खरे टायगर हे एकनाथ शिंदे आहेत, ज्यांनी शिवसेना वाचवली आणि आज त्यांचे नेतृत्व संपूर्ण जगात मोठे होत आहे.
मुंबईचे 25 नगरसेवक आणि आमदार संपर्कात
ठाकरे गटातून लोक बाहेर का पडत आहेत, याचे आत्मपरीक्षण संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंनी करायला हवे, असा सल्ला रामदास कदम यांनी दिला आहे. गुलाबराव पाटील यांनी 20 आमदारांसह हात जोडून विनंती केली होती, मात्र उद्धव ठाकरेंनी त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला. आमदारांना आणि खासदारांना कामासाठी निधीच मिळणार नसेल, तर त्यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात येते. त्यामुळेच आता मुंबईचे 25 माजी नगरसेवक आमच्या संपर्कात असून, 2029 पर्यंत उद्धव ठाकरेंसोबत एकही आमदार शिल्लक राहणार नाही, असा मोठा दावा त्यांनी केला आहे.
संजय राऊतांना नियमच माहिती नाहीत
खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधताना रामदास कदम म्हणाले की, राऊत हे केवळ प्रसिद्धीसाठी बोलतात आणि त्यांना कायद्याचे नियम माहिती नाहीत. लोकसभेत जेव्हा वेगळ्या गटाला मान्यता मिळते, तेव्हा ते नियमित होतात आणि त्यानंतर पक्षप्रवेश करता येतो. जेव्हा आपले आमदार सुरतला गेले होते, तेव्हा ते तिथे पोहोचण्याआधीच राऊतांनी त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन शिवीगाळ सुरू केली होती. राऊतांच्या अशाच भाषेमुळे सगळे खासदार आणि आमदार पक्ष सोडून गेले आहेत, अशी सडकून टीका कदम यांनी केली.