कर्ज काढले, दागिने गहाण ठेवून केली गुंतवणूक; रत्नागिरीकरांची कोट्यवधींची फसवणूक

फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांचे जवाब नोंदवून घेण्याचे काम पोलीस करत आहेत. जवळपास 400 गुंतवणूकदारांची यादी पोलिसांकडे असल्याचे म्हटले जात आहे.

Advertisement
Read Time: 3 mins

रत्नागिरीकरांना आणखी एका कंपनीने कोट्यवधी रुपयांचा चुना लावला आहे. गंडा घालणाऱ्या कंपनीचे नाव 'आर्जू टेकसोल' असे आहे. व्यावसायिक संधी बरोबरच गुंतवलेल्या रकमेवर चांगला परतावा देऊ, असे खोटे आश्वासन या कंपनीकडून देण्यात आले होते. त्यामुळे 25 हजार रुपयांपासून ते अगदी 20 लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक शेकडो लोकांनी केली आहे. पण या कंपनीने गुंतवणूकदारांना चुना लावला आहे, त्याची पहिली तक्रार रत्नागिरी ग्रामीण पोलिसात दाखल करण्यात आली आहे. तब्बल 18 लाख रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार राजेश प्रभाकर पत्याने यांनी पोलिसांत दिली आहे. त्यानुसार चार संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांचे जवाब नोंदवून घेण्याचे काम पोलीस करत आहेत. जवळपास 400 गुंतवणूकदारांची यादी पोलिसांकडे असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे फसवणुकीचा आकडा 40 ते 50 कोटी रुपयांच्या घरात जाण्याची शक्यता आहे.

(नक्की वाचा: Porsche Accident Pune Case: आरोपीच्या आजोबांना अटक, ड्रायव्हरला धमकावल्याचा आरोप)

नेमके काय आहे प्रकरण? 

जून 2021मध्ये 'आर्जू टेकसोल' या कंपनीची स्थापना करण्यात आली होती. रत्नागिरीतील एमआयडीसी परिसरात भाड्याच्या जागेत या कंपनीने आपले ऑफिस थाटले. 25 हजार रुपये ते 40 लाख रुपयांपर्यंत वेगवेगळ्या डिपॉझिटच्या स्कीम होत्या. 15 महिने, 36 महिने आणि 60 महिने अशा मुदतीच्या स्कीम होत्या. तसेच कच्चा माल देऊन पक्का माल घेण्याचे आश्वासनही देण्यात होते. तक्रारदार राजेश पत्याने यांनाही आरोपींनी खिळे बनवण्याचे स्वयंचलित यंत्र, कच्चा माल तसेच माल तयार केल्यावर मोबदला देतो, असे खोटे आश्वासन दिले होते.

Advertisement

(नक्की वाचा: Dombivli MIDC Blast : डोंबिवली स्फोट प्रकरणात मोठी कारवाई, मुख्य आरोपीला अटक)

फिर्यादींनी गुंतवणूक केलेल्या 18 लाख रुपयांवर 16 टक्क्यांप्रमाणे 2 लाख 88 हजार रुपये इतकी रक्कम दरमहा परतावा देतो तसेच 15 महिने पूर्ण झाल्यावर भरलेली डिपॉझिटची रक्कम परत देतो, असे देखील सांगितल्याचे तक्रारीत म्हटले. यासाठीचे अ‍ॅग्रीमेंटही करून देतो, असे आरोपींनी सांगितलं होतं. पण आजवर कोणतंही अ‍ॅग्रीमेंट केले नाही आणि मोबदला म्हणून कोणतीही रक्कमही दिली नाही, असे तक्रारदारांचं म्हणणं आहे. आरोपींनी संगनमताने आपली 18 लाख रुपयांची फसवणूक केल्याचे पत्याने यांनी तक्रारीत म्हटले आहे.

Advertisement

(नक्की वाचा: न्यायाधीशांच्या घरी चोरट्यांनी मारला डल्ला, परदेशी चलनाबरोबरच दागिने लांबवले)

4 जणांवर गुन्हा दाखल

पत्याने यांच्या तक्रारीनुसार 'आर्जू टेकसोल' कंपनीचे प्रसाद शशिकांत फडके, संजय विश्वनाथ सावंत, संजय गोविंद केळकर, अनि उर्फ अमर महादेव जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

पोलिसांची कार्यालयावर धाड

रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर ग्रामीण पोलीस तसेच आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी एमआयडीसीतील कंपनीच्या कार्यालयावर धाड टाकत कागदपत्रांची तपासणी केली. तसेच गोदामाचीही झाडाझडती घेतली. सध्या पोलीस तपास सुरू आहे. फसवणूक झालेल्यांचे जबाब घेतले जात आहेत. 

फसलेले गुंतवणूकदार मारताहेत कार्यालयावर चकरा 

'आर्जू टेकसोल' कंपनीविरोधात 18 लाख रुपयांच्या फसवणूकीची तक्रार झाल्यानंतर आता फसवणूक झालेले गुंतवणूकदार कंपनीच्या कार्यालयाबाहेर चकरा मारताहेत. काहींनी 25 हजार रुपये, 1 लाख रुपये, पावणेदोन लाख रुपये गुंतवले आहेत. तर काहींनी अगदी 15 ते 20 लाख रुपयांचीही गुंतवणूक केली आहे. आपल्याला काहीतरी रोजगार उपलब्ध होईल, या आशेने देखील काहींनी उसणे तसेच अगदी दागिने गहाण ठेवून पैसे गुंतवले आहेत. अंदाजे  40 ते 50 कोटी रुपयांचा हा फसवणुकीचा आकडा आहे. कंपनीने पैसे घेतले, मात्र ना दिला कच्चा माल, ना केले अग्रीमेंट.. पैसेही परत केले नाहीत. चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर हे संचालक आता फरार झाले आहेत. तक्रारीसाठी आता आणखी गुंतवणूकदार पुढे येण्याची शक्यता आहे. गुंतवणूकदारांचा हा आकडा जवळपास एक हजारच्याही पुढे असण्याची शक्यता आहे. सध्या मात्र गुंतवणूकदार कंपनीच्या बंद कार्यालयाकडे हताशपणे पाहताहेत. 

रत्नागिरीकरांची पुन्हा-पुन्हा फसवणूक

रत्नागिरीकरांची आजवर अनेक कंपन्यांनी अर्थिकदृष्ट्या फसवणूक केली आहे. कमी कालावधीत दुप्पट रक्कम देऊ किंवा गुंतवणूक केलेल्या रकमेवर योग्य त्या वस्तू देऊ. असे सांगत अनेक कंपन्यांनी रत्नागिरीकरांना गंडा घातला आहे. मात्र अजूनही लोक शहाणे होत नाहीत. आता पुन्हा आर्जू कंपनीने जवळपास 40 ते 50 कोटी रुपये किंवा त्याहीपेक्षा जास्त रकमेची फसवणूक गुंतवणूकदारांची केली आहे.

VIDEO: उसनवारी घेतली, दागिने गहाण ठेवले; चांगल्या परताव्याच्या आमिषापोटी रत्नागिरीकर फसले