Nagpur News : RTI मधून शिक्षकांचा मोठा घोटाळा उघड, एकाच वेळी शिक्षकांची दोन ठिकाणी हजेरी अन् प्रमोशनही

गुरुजी एकाच वेळी दोन ठिकाणी कसे? राज्यातील हजारो शिक्षकांना आता हा प्रश्न विचारला जात आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Nagpur News : गुरुजी एकाच वेळी दोन ठिकाणी कसे? राज्यातील हजारो शिक्षकांना आता हा प्रश्न विचारला जात आहे. त्याला कारण देखील फार गंभीर आहे. शिक्षक पदावर नियमित नोकरीवर असताना, म्हणजेच शाळेत मुलांना दररोज शिकवत असताना हजारो शिक्षकांनी बीएड हा अभ्यासक्रम 100 टक्के हजेरी देऊन पूर्ण केला आणि तो संस्था चालकांनी मान्य केल्याचा गंभीर घोटाळा महाराष्ट्रात घडला आहे. शाळेत शिकविणाऱ्या शिक्षकांना 100 टक्के उपस्थिती अनिवार्य आहे. 

महाविद्यालयात देखील व्यक्तिशः हजर राहून नियमित DEd, BEd पूर्ण करावा लागतो, असा अनिवार्य नियम आहे. या शिक्षकांनी दोन्ही एकाच वेळी करून चक्क प्रमोशन सुद्धा मिळवलं आहे. अशा रीतीने राज्यातील सुमारे आठ ते दहा हजार शिक्षकांनी एकच वेळी दोन ठिकाणी हजर राहण्याचा हा चमत्कार करून दाखवला आहे. मात्र, त्यामुळे प्रामाणिकपणे BEd केलेल्यांवर अन्याय झाला आहे. बोगस शालार्थ आयडी आणि शिक्षक भरती घोटाळ्यानंतर शिक्षण विभागातील आता या घोटाळ्यात शासकीय नियमांचे धडधडीत उल्लंघन करत पगारापोटी शासकीय निधीला कोट्यवधी रुपयांचा दरमहा गंडा घालण्यात येत आहे.  

Advertisement

नक्की वाचा - शालार्थ आयडी घोटाळ्यात आतापर्यंतची मोठी कारवाई, आरोपींची थेट न्यायालयीन कोठडीत रवानगी

एकट्या नागपूर विभागात असा चमत्कार आठशे ते हजार शिक्षकांनी केला असून गेली चार वर्षे नागपूर विभागाचे सर्व शिक्षणाधिकारी या संदर्भात नागपूर विभागाच्या शिक्षण उप संचालक यांना कुठलीही माहिती देत नाहीयेत. एकाच वेळी दोन ठिकाणी हजर राहणे आपल्यापैकी कुणालाही कदापि शक्य नाही. त्यामुळे या गुरुजींना ही किमया कशी शक्य झाली हा पहिला प्रश्न आहे. हा चमत्कार कसा करतात ते सर्वांना का शिकवत नाही..हा दुसरा प्रश्न आहे.  वर्गात नेहमी खरे बोला असे सांगणाऱ्या या गुरुजींनी मात्र, जर खोटेपणा केला आहे तर, ते भविष्यातील सुसंस्कारित, चारित्र्यसंपन्न पिढी कशी घडवतील हा तिसरा प्रश्न आहे. 

एकाचवेळी नियमित नोकरीत हजर असताना बीएड सारखा पूर्ण वेळ नियमित अभ्यासक्रम देखील हजर राहून पूर्ण केलेले किमान एक हजार शिक्षक एकट्या नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांत असल्याची माहिती आहे. आणि हे प्रकरण दडपून टाकण्याचे 2021 पासून प्रयत्न सुरू देखील असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणातील दोषींची यादी सादर करण्यासाठी नागपूर विभागातील सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना 2021 मध्ये सांगण्यात आले होते. गेल्या जुलै महिन्यात देखील पुन्हा एक आठवडा अवधी देण्यात आला होता. मात्र ऑगस्ट महिना आला तरी एकाही शिक्षणाधिकाऱ्यांनी अद्याप यादी दिलेली नाही, अशी स्पष्ट कबुली नागपूर विभागाच्या शिक्षण उपसंचालक माधुरी सावरकर यांनी ndtv मराठीशी बोलताना दिली आहे. 

Advertisement
Topics mentioned in this article