शरद सातपुते: गेल्या काही दिवसांपासून राज्यात औरंगजेबाच्या कबरीवरुन राजकारण सुरु आहे. अशातच आता संभाजीराजे छत्रपती यांनी रायगड किल्ल्यावर असलेली वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरुन मोठी मागणी केली आहे. वाघ्या कुत्र्याचा इतिहासात कोणताही संबंध नाही त्यामुळे ती समाधी हटवण्यात यावी अशी मोठी मागणी केली आहे. याबाबत आता शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी मोठे विधान केले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाले संभाजी भिडे?
'रायगडवरील वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाला संभाजी भिडे यांनी समर्थन दिले आहे. संभाजीराजे भोसले बोलतात ते 100 टक्के चूक आहे. वाघ्या कुत्र्याबाबत आपण वाचलं आहे आणि ती कथा सत्य आहे. वाघ्या कुत्र्याने चितेत उडी घेतली हे सत्य आहे, त्यामुळे स्मारक म्हणून ते केलं आहे. माणसं एकनिष्ठ नसतात,तेवढी कुत्री असतात, निदान आताच्या युगात देशाशी एकनिष्ठ राहायचे आहे,याचे धोतक म्हणून वाघ्या कुत्र्याचे स्मारक तिथंच पाहिजे,' असं ते म्हणालेत.
यावेळी संभाजी भिडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज हिंदूत्ववादी होते या नितेश राणे यांच्या वाक्याचेही समर्थन केले. "छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व धर्मीय नव्हते ते फक्त हिंदुत्ववादी होते. मात्र इतिहासाचा अभ्यास कमी आणि शिवाजी महाराजांचे नाव राजकारणात वापरण्याचा हाव असलेल्या लोकांनी हे चिकटवले. ते आपल्या सोयीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगत असल्याचा," आरोप हे संभाजी भिडे यांनी यावेळी केला.
दरम्यान, यावेळी बोलताना संभाजी भिडे यांनी कुणाल कामरा प्रकरणावरुन राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सुरु असलेल्या राड्यावरुनही संताप व्यक्त केला. "विधानसभेत जो धुडगूस चाललाय हे लोकशाहीला शोभणारे नाही, ज्यांनी ज्यांनी हा निचपणा केलाय ते सगळे देशद्रोही आहेत आर आर आबांनी डान्स बार बंद केले..मात्र त्याच डान्स बारचे सावत्र भावंडे म्हणजे कामरा नावाच्या पद्धतीची हॉटेल चालवणे', असा आरोपही संभाजी भिडेंनी केला.