संभाजीराजे विशाळगडावर जाणार, शिवप्रेमींना घातली साद! कोल्हापूरमध्ये जमावबंदी लागू

Sambhajiraje Chhatrapati on Vishalgad : कोल्हापूर जिल्ह्यातल्या विशाळगडावरील अतिक्रमणावर माजी खासदार  संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
Sambhajiraje Chhatrapati on Vishalgad
कोल्हापूर:

विशाल पुजारी, प्रतिनिधी

Sambhajiraje Chhatrapati on Vishalgad : कोल्हापूर जिल्ह्यातल्या विशाळगडावरील अतिक्रमणावर माजी खासदार  संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी सर्व शिवप्रेमींनी उद्या (रविवार, 14 जुलै) विशाळगडावर पोहोचावं असं आवाहन केलंय. सरकारने दुर्लक्ष केल्यामुळेच आम्हाला आज विशाळगडावर जावं लागत आहे. शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी आम्ही जातोय असं म्हणत, संभाजीराजेंनी शिवप्रेमींना 'चलो विशाळगड'ची साद घातली आहे. 

 ( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय म्हणाले संभाजीराजे?

कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड आणि पन्हाळागड या दोन किल्ल्यांना मोठं ऐतिहासिक महत्त्व आहे. छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळागडावरील सिद्दी जोहरचा वेढा भेदून विशाळगडावर पोहोचले होते. बाजीप्रभू देशपांडे आणि मावळ्यांनी पराक्रमाची शर्थ करुन सिद्दी जोहरच्या सैन्याला पराभूत केलं. प्रत्येक शिवप्रेमींसाठी वंदनीय असलेल्या विशाळगडाला अनधिकृत अतिक्रमणाचा वेढा पडलाय. विशाळगड येथील अनाधिकृत अतिक्रमणविरोधात हिंदूत्ववादी संघटनाकडून आंदोलन करण्यात येत आहे. तसेच विविध पक्ष, संघटनांकडून विविध मागण्यांसाठी आंदोलन, उपोषण, मोर्चा, इत्यादी प्रकारचे आंदोलन करण्यात आलं आहे.

छत्रपती संभाजीराजे यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेत या विषयावरील भूमिका स्पष्ट केली. विशाळगड पवित्र ठिकाण आहे. तिथं बकरी, कोंबड्या आणि मध्यपान केलं जातं. हे खपवून घेतलं जाणार नाही. या संदर्भात सरकारची काय भूमिका आहे? सरकार दीड वर्षात या विषयावर एकही सुनावणी लावू शकलं नाही. स्थानिक लोकप्रतिनिधी तुमच्यावर प्रेशर टाकतो म्हणून तुम्ही गप्प बसता का?  असा सवाल संभाजीराजे यांनी विचारला.

( नक्की वाचा : दिल्लीतील शाहू महाराजांचा पुतळा बदलण्याची मागणी का सुरु झाली आहे? )
 

पूल कसा उभा राहिला?

'विशाळगडावरील अतिक्रमण पाहता आपण तिथं का गेलो नाही याची मला खंत वाटते, असं संभाजीराजे यांनी सांगितलं. तिथं ग्रामपंचायत पूल कसा उभा राहू शकतं? स्थानिक आमदारानी माझ्या बाजूला  येऊन बसावं. महायुतीसोबत तुम्ही आहात म्हणून  प्रशासनावर दबाव टाकता. स्थानिक आमदार आणि राज्य सरकार याला जबाबदार आहे  अजूनही वेळ आहे तुमच्या हातात आहे ते अतिक्रमण काढून टाका,' अशी मागणी त्यांनी केली. 

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर माझा विश्वास आहे. त्यांनी प्रतापगडावरील अतिक्रमण काढलं याचं कौतुक आहे. विशाळगडावर दोन्ही समाजाचं आणि सरकारचं अतिक्रमण आहे. कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये असं वाटत असेल तर दीड वर्ष झोपला होता का? लोकांची भावना सरकारपर्यंत पोहोचावी हा माझा उद्देश आहे. सर्व गडकोट किल्ल्यावरील अतिक्रमण काढले पाहिजेत, अशी मागणी त्यांनी केली.  

Advertisement

( नक्की वाचा : 'लंडनमधून आणण्यात येणारी वाघनखं महाराजांची नाहीत', इतिहास संशोधकाचा खळबळजनक दावा )
 

कोल्हापूरमध्ये जमावबंदी

विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यासाठी सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर 29 जुलैपर्यंत जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. यापूर्वीचा बंदी आदेश 14 जुलै पर्यंतचा आहे. त्यानंतर आता पुन्हा नव्याने हा आदेश लागू करण्यात आलेला आहे. 15 जुलै  रोजी सकाळी 6 ते दिनांक 29 जुलै रोजी रात्री 24 वाजेपर्यंत  महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) अ ते फ आणि कलम 37 (3) अन्वये बंदी आदेश जारी करण्यात येत असल्याचे अपर जिल्हादंडाधिकारी संजय तेली यांनी जाहीर केलंय. 

हा आदेश ज्या सरकारी अधिकारी/कर्मचारी यांना त्यांची कर्तव्य, अधिकार बजाविणे संदर्भात कामकाज करताना उपर्निर्दिष्ट वस्तू हाताळाव्या लागतात आणि एकत्र जमावे लागते व ज्या व्यक्तींनी पोलीस अधीक्षक, कोल्हापूर अगर संबंधित  उपविभागीय पोलीस अधिकारी अगर संबंधित विभागाचे पोलीस निरीक्षक किंवा सक्षम प्राधिकारी यांची परवानगी घेतलेली आहे, अशा व्यक्तींना तसेच सर्व जातीधर्माचे सण/उत्सव/जयंती/यात्रा इ. हे शांततामय मार्गाने साजरे करण्याकरीता जमा होणारा जनसमुदाय यांना व लग्न, इतर धार्मिक समारंभ, सण, यात्रा, प्रेतयात्रा इत्यादी यांना लागू असणार नाही, असं यामध्ये स्पष्ट करण्यात आलंय. 

Advertisement