विहिरीत लपून बसलेल्या एका मगरीला जेरबंद करण्यात आला आहे. सांगलीच्या कवठेमहांकाळ तालुक्यातल्या अग्रणी धुळगावत दहशत निर्माण केली होती. या मगरीने प्राण्यांच्यावर हल्ले केले होते. त्यामुळे त्रस्त झालेल्या शेतकरी आणि ग्रामस्थांनी विहिरीतून मगरीला बाहेर काढण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न केला होता. आता या महाकाय मगरीला जेरबंद करण्यात आलं आहे. एका शेतकऱ्याच्या विहिरीमध्ये या मगरीचं वास्तव्य होतं. वन विभाग,ग्रामस्थ आणि प्राणी मित्र यांच्या मदतीने तब्बल सात ते आठ फूट असणारी ही मगर अथक प्रयत्नानंतर पकडण्यात आली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अग्रण धुळगाव मधील शेतकरी संतोष भोसले यांच्या एका पडक्या विहिरीमध्ये ही मगर, गेल्या वर्षभरापासून वास्तव्यास होती. अग्रणी नदीला गेल्यावर्षी पुर आला होता. या पुरातून ती मगर वाहत आली होती. पाणी आटल्यानंतर या मगरीने भोसले यांच्या विहिरीचा आसरा घेतला होता. कधी कधी ही मगर नदी काठावर दिसू लागली. त्यानंतर या मगरीने भोसले यांच्या जनावरांना लक्ष केलं. शेळी आणि कुत्र्यांवर ती हल्ले करू लागली. या मगरीने एका महिलेवर देखील हल्ला केला होता. त्यामुळे भयभीत झालेल्या भोसलेंनी शेतातलं घर सोडून गावात राहणं पसंत केलं.
मगरीची ही दहशत अग्रणी धुळगावमध्ये चांगली पसरली होती. त्यानंतर वन विभागाकडून या मगरीला पकडण्यासाठी चार ते पाच वेळा प्रयत्न झाला होता. पण मगर काही केल्यास सापडत नव्हती. ती विहिरीतला पाण्याचा आसरा घ्यायची. त्यामुळे या मगरीला बाहेर कशी काढायची असा प्रश्न सर्वां समोर होता. यावर अखेर अग्रणी धुळगावच्या ग्रामस्थांनी विहीर मुजवण्याचा निर्णय घेतला. विहिरीत जेसीबीने हळूहळू माती टाकायला सुरुवात केली. तसं पाणी आणि मगर वर येऊ लागले. त्यानंतर प्राणी मित्रांनी आणि वन विभागांनी सापळा रचून दोरीच्या साह्याने या मगरीला जेरबंद केलं.
भल्या मोठ्या मगरीला अखेर पकडण्यात आलं. त्यानंतर सगळ्यांनीच सुटकेचा निश्वास सोडला .वन विभागाकडून आता या मगरीला शिराळा येथील चांदोली अभयारण्यातील नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलेलं आहे. त्यामुळे मगरीपासून अग्रण धुळगावची अखेर सुटका झाली आहे. मगरीला पकडत असताना गावकऱ्यांनी आणा बघ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. पण मगरीला पकडताच सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.