शरद सातपुते, सांगली:
Sangli Politics: सांगली जिल्ह्यातील राजकारणात मोठी उलथापालथ होत असून काँग्रेस पक्षाला जबर धक्का बसला आहे. सांगली–मिरज–कुपवाड महानगरपालिकेचे दोन माजी महापौर, एक माजी उपमहापौर आणि किमान १२ माजी नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) मध्ये प्रवेश करणार असल्याने जिल्ह्यात राजकीय भूकंप झाला आहे.
सांगलीत काँग्रेसला खिंडार
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सांगलीचे माजी महापौर किशोर जामदार, माजी महापौर मैनुद्दीन बागवान, माजी उपमहापौर आनंदा देवमाने, चंद्रकांत हुलवान यांच्यासह काही माजी नगरसेवक नव्याने इच्छुक उमेदवारांनी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान राष्ट्रवादीत प्रवेशाबाबत सकारात्मक संकेत मिळाल्याचे सांगण्यात येत आहे.
Manikrao Kokate : कोकाटेंचा गेम ओव्हर ! मुख्यमंत्र्यांनी पंख छाटले, अटक वॉरंटनंतर झाला मोठा निर्णय
बड्या नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश
या संदर्भात बोलताना किशोर जामदार यांनी सांगितले की, “केंद्र व राज्यात सत्ताधारी पक्षातून निधी उपलब्ध करून महापालिकेच्या सर्वांगीण विकासासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.” या पक्षप्रवेशामध्ये आणखी १६ ते १७ माजी नगरसेवक सामील होणार असल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. येत्या सोमवारी अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत अधिकृत पक्षप्रवेश सोहळा पार पडणार असल्याचेही समजते.
दरम्यान, मिरज शहरातील काँग्रेसचे प्रमुख नेतृत्वच राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याने काँग्रेस पक्षात मोठे खिंडार पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश सांगली जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणारा ठरणार असल्याचे मानले जात आहे.