Sangli News: हृदयद्रावक! सेप्टिक टँक साफ करताना गुदमरून तिघांचा मृत्यू; वाचवायला गेलेले 5 जणही गंभीर

Sangli News: या तिघांना वाचवण्यासाठी कंपनीतील इतर पाच कामगारांनी प्रयत्न केले. मात्र, वायूचा प्रभाव इतका तीव्र होता की या पाचही जणांची प्रकृती बिघडली. त्यांना अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले

जाहिरात
Read Time: 2 mins
प्रतिकात्मक फोटो (AI Photo)

शरद सातपुते, सांगली

Sangli News: सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूर-पेठ हद्दीत असलेल्या एका कंपनीत रविवारी सायंकाळी मोठी दुर्घटना घडली. कंपनीचा सेप्टिक टँक साफ करण्यासाठी उतरलेल्या तीन कर्मचाऱ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. टँकमधील ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे आणि विषारी वायूमुळे या कामगारांचा गुदमरून मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

नेमकी घटना कशी घडली?

सेप्टिक टँक साफ करण्यासाठी सुरुवातीला सुभाष जाधव हे टॅंकमध्ये उतरले होते. मात्र, टँकमधील विषारी वायूमुळे त्यांना चक्कर आली आणि ते आतच कोसळले. सुभाष जाधव यांना वाचवण्यासाठी सचिन तानाजी जाधव तातडीने टँकमध्ये उतरले. मात्र, त्यांनाही वायूची बाधा झाली आणि ते जागीच बेशुद्ध पडले.

त्यानंतर कंपनीतील कामगार रंगराव माळी यांनी मदतीसाठी धाव घेतली आणि ते टँकमध्ये उतरले, पण दुर्दैवाने तेही बाहेर येऊ शकले नाहीत. या तिघांनाही तातडीने बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

वाचवण्यासाठी गेलेले 5 जण जखमी

या तिघांना वाचवण्यासाठी कंपनीतील इतर पाच कामगारांनी प्रयत्न केले. मात्र, वायूचा प्रभाव इतका तीव्र होता की या पाचही जणांची प्रकृती बिघडली. त्यांना अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले असून, त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

Advertisement

या घटनेमुळे संपूर्ण पेठ आणि ईश्वरपूर परिसरात शोककळा पसरली असून, औद्योगिक क्षेत्रातील कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे.

Topics mentioned in this article