Sangli News: सांगलीत चक्क झाडांसाठी उभी राहिली 'आर्मी'; 78,000 झाडं लावण्याचं मोठं मिशन कसं होणार पूर्ण?

Sangli News: सांगली जिल्ह्यात निसर्ग रक्षणाची एक आगळीवेगळी आणि अभूतपूर्व चळवळ उभी राहिली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Sangli News: विशेष म्हणजे, लोकांनी स्वतःहून या गटाला 'ट्री आर्मी' असे नाव दिले आहे.
सांगली:

Sangli News: सांगली जिल्ह्यात निसर्ग रक्षणाची एक आगळीवेगळी आणि अभूतपूर्व चळवळ उभी राहिली आहे. रस्ते रुंदीकरण किंवा बांधकामाच्या नावाखाली कुऱ्हाडीचा घाव सोसणाऱ्या पिंपळाच्या झाडांना आता नवे आयुष्य मिळत आहे. ही झाडे तोडण्याऐवजी ती सुरक्षितपणे उपटून त्यांचे पुनर्रोपण करण्याचा उपक्रम सांगलीकरांनी हाती घेतला असून, एका साध्या मोहिमेचे आता मोठ्या 'लोकचळवळीत' रूपांतर झाले आहे.

हजारो हात सरसावले, उभी राहिली 'ट्री आर्मी'

सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात आमदार सुहास बाबर आणि स्थानिक नागरिकांनी हा वृक्षारोपणाचा विचार मांडला. सोशल मीडियाच्या ताकदीमुळे हा विचार वाऱ्यासारखा पसरला आणि बघता बघता हजारो नागरिक या मोहिमेत सामील झाले. 

Advertisement

विशेष म्हणजे, लोकांनी स्वतःहून या गटाला 'ट्री आर्मी' असे नाव दिले आहे. आज लोक केवळ चर्चेत सहभागी न होता स्वतःहून जागा उपलब्ध करून देणे, पाणी पाजणे आणि प्रत्यक्ष श्रमदानासाठी मैदानावर उतरत आहेत.

78 हजार वृक्षलागवडीचे मोठे ध्येय

या मोहिमेच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यात तब्बल 78,000 वृक्षलागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या उपक्रमाला सर्वच स्तरांतून भरभरून मदत मिळत आहे. आतापर्यंत मोहिमेअंतर्गत 5,300 आंब्याची झाडे लावण्यात आली आहेत. समाजातील प्रत्येक घटक यात खारीचा वाटा उचलत आहे. विटा नगरपालिकेच्या एका नगरसेवकाने आपल्या बागेतील 4 वर्षांची वाढलेली 52 झाडे या मोहिमेसाठी दान केली, तर आळसंद ग्रामपंचायतीने 500 झाडांचे रोपण करून या मोहिमेला बळ दिले आहे.

सांगलीत बहरणार जपानी पद्धतीचे 'मियावाकी जंगल'

केवळ वृक्षारोपणच नाही, तर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सांगलीत जंगल उभे केले जात आहे. जिल्हा प्रशासन आणि वन विभागाच्या सक्रिय सहकार्याने सांगलीत 1 एकर जागेत जपानी पद्धतीचे 'मियावाकी जंगल' तयार केले जात आहे. या पद्धतीमुळे कमी जागेत दाट जंगल वेगाने वाढण्यास मदत होणार आहे.

पुन्हा दिसणार महामार्गांवरील 'ग्रीन टनेल'

काही वर्षांपूर्वी रस्ते रुंदीकरणामुळे महामार्गांच्या कडेला असलेली मोठी झाडे तोडली गेली होती, ज्यामुळे प्रवाशांना मिळणारी सावली आणि निसर्गाचे सौंदर्य नष्ट झाले होते. ही निसर्गाची सावली म्हणजेच 'ग्रीन टनेल' पुन्हा निर्माण करण्याचे स्वप्न ट्री आर्मीने पाहिले आहे. यासाठी गायरान जमिनी आणि रस्त्यांच्या दुतर्फा वड, पिंपळ, बहावा, करंज आणि चिंच यांसारखी स्थानिक मातीतील मोठी झाडे लावली जात आहेत.

Advertisement

येत्या 5 जून रोजी जागतिक वसुंधरा दिनाचे औचित्य साधून ही मोहीम अधिक व्यापक केली जाणार आहे. सांगलीच्या या 'ट्री आर्मी'ने राज्यासमोर एक नवा आदर्श ठेवला असून, अधिकाधिक नागरिकांनी या हिरव्या क्रांतीत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
 

Topics mentioned in this article