मुंबई: राज्याच्या राजकारणात सध्या शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांच्या नरकातला स्वर्ग या पुस्तकाची जोरदार चर्चा सुरु आहे. शनिवारी या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे त्याआधीच त्यामधील विविध विषयांवरील लिखानांमुळे राज्याच्या राजकारणात टीका- टिप्पण्यांना जोर आला आहे. मविआच्या सत्तास्थापनेबाबत या पुस्तकामध्ये महत्त्वाचा खुलासा केला असून गृहमंत्रीपद अनिल देशमुख यांच्याकडेच कसे गेले? यमागची शरद पवार यांची रणनिती अधोरेखित केली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
या पुस्तकात संजय राऊत म्हणतात की, "महाविकास आघाडी सरकारचे बाळंतपण साधे नव्हते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर गृहखाते कोणाकडे जाणार यावर पैजा लागल्या. अजित पवार पहाटेचा शपथविधी आटोपून रिक्त हस्ते पुन्हा स्वगृही परतले होते. त्यांचा विचार होईल, असे मला वाटले नव्हते. छगन भुजबळ हे तुरुंगातून सुटून आले तरी त्यांच्यावर खटले चालू होते. भुजबळ यांची गृहमंत्री होण्याची इच्छा प्रबळ होती. त्यांच्यात क्षमताही होती पण त्यांच्या तुरुंग प्रवासाची अडचण ठरली असावी,"
तसेच "जयंत पाटील यांना गृहमंत्रिपदाची जबाबदारी नकोच होती. 'तो एक थैकलेस जॉब आहे,' असे त्यांचे म्हणणे होते. वळसे-पाटील यांच्या प्रकृतीच्या कुरबुरी होत्या. कोल्हापूरचा हसन मुश्रीफ हा एक रांगडा व तगडा गडी. मुश्रीफ हे एक उत्तम चॉईस ठरले असते. परंतु ते मुसलमान असल्याने प्रत्येक गोष्टीत त्यांना टार्गेट केले जाईल, अशी भीती पवारांना वाटली. खरं तर मुश्रीफ हे कमालीचे पुरोगामी. पक्के निधर्मी आणि दिलखुलास व्यक्तिमत्त्व. शाहू महाराजांवर अपार श्रद्धा असलेले कार्यकर्ते पण शेवटी धर्म आडवा आला, असाही दावा यामध्ये करण्यात आला आहे.
दरम्यान, गृहमंत्री कोण?' या प्रश्नावर एकदा पवार म्हणाले, "विदर्भातला नवा प्रयोग करून पाहू या!" तो प्रयोग म्हणजे अनिल देशमुख. देशमुखांनी गृहखाते उत्तमरीत्या सांभाळले. मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी त्यांचे उत्तम नाते होते. पण तीन प्रमुख पक्षांत बदल्या, बढत्या आणि नेमणुकांच्या कटकटी असतात. त्या देशमुखांच्या वाट्याला आल्या. देशमुख हे नागपूरचे. त्याआधी फडणवीस हेच नागपूरचे सत्ताकेंद्र होते. देशमुख गृहमंत्री होताच सर्व काही बदलले. देशमुखांचा नागपूर-विदर्भातील वाढता प्रभाव, गृहखात्याचे वलय, त्यांना मिळणारे सॅल्यूट हे जुन्या सत्ताकेंद्रास सहन झाले नाहीत आणि तेथूनच देशमुखांच्या रस्त्यात काटे निर्माण होऊ लागले, असेही या पुस्तकामध्ये म्हटले आहे.