जाहिरात

Maharashtra Politics: 'देवाभाऊ अभिनंदन, तुम्ही कौतुकास पात्र...', 'सामना'मधून स्तुतीसुमने

मुख्यमंत्र्यांच्या गडचिरोली दौऱ्यावेळी जहाल नक्षली ताराक्कासह 11 नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली. देवेंद्र फडणवीस यांच्या या दौऱ्याचे आता शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामनामधून कौतुक करण्यात आलं आहे. 

Maharashtra Politics: 'देवाभाऊ अभिनंदन, तुम्ही कौतुकास पात्र...', 'सामना'मधून स्तुतीसुमने

Saamana Editorial on Devendra Fadnavis: नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी राज्याचे मुख्यमंत्री देवेंंद्र फडणवीस यांनी गडचिरोली दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी विविध विकासकामांची सुरूवात करतानाच सामाजिक सलोखा आणि शांतता अबाधित रहावी यासाठी आपला संकल्प जाहीर केला. मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यावेळी जहाल नक्षली ताराक्कासह 11 नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली. देवेंद्र फडणवीस यांच्या या दौऱ्याचे आता शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामनामधून कौतुक करण्यात आलं आहे. 

सामना अग्रलेख जसाच्या तसा....

'मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीन वर्षात कामाला सुरुवात केली व त्यासाठी त्यांनी गडचिरोली जिल्ह्याची निवड केली. मंत्रिमंडळातील अनेक मंत्री मलईदार खाती आणि विशिष्ट जिल्ह्याचेच पालकमंत्रीपद मिळावे यासाठी अडून बसले असतानाच मुख्यमंत्री फडणवीस गडचिरोलीत पोहोचले व त्या नक्षलग्रस्त जिल्ह्यात विकासाचे नवे पर्व सुरू केले. संपूर्ण देश नवीन वर्षाच्या स्वागतात आणि उत्सवात मग्न असताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी नव्या वर्षाचा पहिला दिवस गडचिरोलीमध्ये घालवला. नुसताच घालवला नाही, तर अनेक विकास प्रकल्पांचे भूमिपूजन, उद्घाटन केले, काही प्रकल्पांचे लोकार्पण केले.'

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

त्यावेळी बोलताना त्यांनी गडचिरोलीच्या विकासाच्या नव्या पर्वाचा हवाला दिला. मुख्यमंत्री म्हणाले तसे खरेच होणार असेल तर ते फक्त गडचिरोलीच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रासाठीच सकारात्मक म्हणावे लागेल. प्रामुख्याने गडचिरोली जिल्ह्यातील सामान्य जनता, गरीब आदिवासी यांच्यासाठी तर खरोखरच हा दिवस कलाटणी देणारा ठरेल. गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांमुळे आजवर विकासाची साधी तिरीपही येऊ शकली नाही, असा आक्षेप घेतला जातो. त्यात तथ्य आहेच, परंतु राज्यकर्त्यांची इच्छाशक्तीही अशा ठिकाणी अनेकदा महत्त्वाची ठरत असते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी ती दाखविण्याचे ठरविले असेल तर आनंदाची गोष्ट आहे.. असं सामनामध्ये म्हटलं आहे. 

 गडचिरोलीच्या या आधीच्या पालकमंत्र्यांनीही त्या ठिकाणी ‘मोटरसायकल'वरून वगैरे अनेकदा फेरफटके मारले होते. तथापि, त्यांचे हे फेरफटके तेथील आदिवासींच्या विकासापेक्षा ठरावीक खाणसम्राटांचे टक्के कसे वाढतील यासाठीच होते, असे आरोप तेव्हा उघड उघड केले गेले. तथापि, ‘संभाव्य पालकमंत्री' फडणवीस मात्र गडचिरोलीमध्ये नवे काही तरी करतील, तेथील आदिवासींच्या जीवनात परिवर्तन करतील, असे एकंदरीत दिसत आहे. फक्त केलेल्या दाव्यानुसार गडचिरोलीच्या विकासाचा वादा पूर्ण करण्यासाठी त्यांना विकासाचा तेथील ‘रोडमॅप' प्रत्यक्षात आणावा लागेल. जहाल महिला नक्षलवादी ताराक्कासह 11 नक्षलवाद्यांनी फडणवीस यांच्या उपस्थितीत केलेले समर्पण आणि त्याच वेळी स्वातंत्र्यानंतर म्हणजे 77 वर्षांनी प्रथमच धावलेली अहेरी ते गर्देवाडा ही एसटी बस या गोष्टी निश्चितच मुख्यमंत्र्यांच्या ‘मिशन गडचिरोली'च्या दृष्टीने बोलक्या आहेत. 

( नक्की वाचा : IAS Transfer मुख्यमंत्र्यांनी दिले प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश, मुंडे बंधू-भगिनींना दिलासा )

‘नक्षलवाद्यांचा जिल्हा' याऐवजी गडचिरोलीला ‘पोलाद सिटी' ही नवीन ओळख विद्यमान मुख्यमंत्री मिळवून देणार असतील तर त्याचे स्वागत करायला हवे. गडचिरोली हा महाराष्ट्राचा शेवटचा नव्हे तर पहिला जिल्हा म्हणून ओळखला जावा, यासाठी फडणवीस प्रयत्न करणार आहेत. ते चुकीचे नाही. फक्त गडचिरोलीच्या विकासाचा हा ‘विडा' आपण तेथील सामान्य जनता आणि गरीब आदिवासी यांच्यासाठीच उचलला आहे. कोणा खाणसम्राटांसाठी नाही, हे दाखवून देण्याची काळजी देवाभाऊंना घ्यावी लागेल. तरच नवीन वर्षाच्या सूर्योदयापासून गडचिरोलीच्या परिवर्तनाची सुरुवात झाली आहे, हा त्यांचा वादा खरा होईल. बीडमध्ये बंदुकीचे राज्य कायम असले तरी गडचिरोलीत संविधानाचे राज्य येत असेल तर मुख्यमंत्री फडणवीस कौतुकास पात्र आहेत.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com