Bhandara Guardian Minister: एकीकडे राज्यात गणेशोत्सवाची लगबग सुरु असतानाच फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. महायुती सरकारने भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री बदलण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते आणि राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे हे भंडाऱ्याचे पालकमंत्री होते. मात्र आता गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांच्याकडे भंडारा जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर विद्यमान पालकमंत्री संजय सावकारे यांच्याकडे बुलढाणा जिल्ह्याच्या सहपालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. या मोठ्या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगल्या असून संजय सावकारे याची उचलबांगडी का केली? याबाबत आता उलट-सुलट चर्चा रंगल्या आहेत.
प्रशासकीय कारणास्तव ही बदल नियुक्ती करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकातून देण्यात आली आहे. या बदलामुळे जिल्ह्यातील विविध विकास कामांना नवे गतीमान मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र सावकारे हे पूर्णकाळ पालकमंत्री म्हणून उपलब्ध नसायचे, अशी तक्रार होती. यामुळेच हा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे.
सावकारे हे झेंडा टू झेंडा भंडाऱ्यात येत होते. भंडाऱ्यामध्ये पुरस्थिती निर्माण झाली होती त्यावेळीही ते आले नव्हते. तसेच भंडाऱ्याला जवळच्या जिल्ह्याचा पालकमंत्री द्या, अशीही मागणी होती. त्यामुळे आगामी नगरपालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने हा निर्णय घेतला असल्याची चर्चा सुरु आहे.
(नक्की वाचा- Pune News: गणेशोत्सव काळात पुण्यात 'या' भागात जड वाहनांना वाहतुकीसाठी बंदी)