Anjali Damania Meet Ajit Pawar: संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा.. अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया करत आहेत. याचसंदर्भात त्यांनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर अंजली दमानिया यांनी अजित पवार हे धनंजय मुंडे यांचा राजीनामा नक्की घेतील, असा विश्वास व्यक्त केला असून तसे आश्वासन त्यांनी दिल्याचे सांगितले आहे. उद्या या संदर्भात अजित पवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाल्या अंजली दमानिया?
'अजित पवार आणि माझी 'जवळपास 25 मिनिटे अजित पवार आणि माझी भेट झाली. सुरुवातीपासून त्यांचे म्हणणे होते की बीडमध्ये झालेलं काळीमा फासणारं कृत्य आहे त्याचं मी समर्थन करत नाही. त्यामुळेच मी त्यांना धनंजय मुंडे, राजश्री मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे कसे एकत्र बिझनेस आहेत, हे दाखवलं. त्यामुळे तुम्ही त्यांचे राजीनामा घेतला पाहिजेत, अशी मागणी मी केली. त्यासाठी त्यांना मी सर्व कायदेशीर बाबी दाखवल्या. ज्यामध्ये सरळसरळ लिहलं आहे की कुठलाही नेता आर्थिक नफा मिळवू शकत नाही. त्यानंतर धनंजय मुंडे, वाल्मिक कराड यांच्या सो कॉल्ड दहशतवादी समर्थकांचे रिल्स व्हिडिओ दाखवले,' अशी माहिती अंजली दमानियांनी दिली.
अजित पवारांनी शब्द दिला...
तसेच 'या सर्व चर्चेनंतर अजित पवार यांनी मी उद्या मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असून सर्व पुरावे दाखवणार आहे, त्यानंतर यासंदर्भात निर्णय घेऊ.. असे आश्वासन दिल्याची माहिती अंजली दमानिया यांनी दिली आहे. आज मी त्यांना जे पेपर दाखवले त्यावरुन धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत कोणतीही शंका राहणे शक्य नाही. धनंजय मुंडे राजक्षी मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे सरळ सरळ आर्थिक व्यवहार त्यांना दाखवले त्यानंतर त्यांची खात्री पटली. इलेक्शन कमिशननने जर ठरवली तर त्यांचे मंत्रिपद काय आमदारकीही रद्द होईल,' असंही अंजली दमानिया यांनी सांगितले.