विशाल पुजारी
शहरातून फेरफटका मारत असताना बऱ्याचदा रिक्षांचा आधार घ्यावा लागतो. याच रिक्षा जर लक्झरीयस सुविधा देत असतील तर या प्रवासाची मजा आणखी द्विगुणित होते. खरंतर हे सध्या शक्य आहे असं सांगितलं तर तुम्हाला नवलच वाटेल. कोल्हापुरातल्या रिक्षा सौंदर्य स्पर्धेत असे लक्झरीस प्रकार पाहायला मिळाले आहेत. विविध प्रकारच्या थीमवर सजवलेल्या रिक्षा या स्पर्धेत होत्या. यामुळे सर्वांचे मनोरंजनतर झालेच पण वेगवेगळ्या सजावणीच्या रिक्षा ही कोल्हापूरकरांना पाहाता आल्या.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा)
दरवर्षीप्रमाणे यंदाही कोल्हापुरात रिक्षा सौंदर्य स्पर्धा पार पडली. महाराष्ट्र रिक्षा चालक संघटनेकडून ही स्पर्धा आयोजित केली जाते. 26 जानेवारीचे औचित्य साधून हा उपक्रम राबवला जातो. कोल्हापूरसह इतरही जिल्ह्यातून रिक्षा चालक या स्पर्धेसाठी येतात. तब्बल 25 वर्षांपासून ही स्पर्धा सुरू असल्याचे या स्पर्धेच्या आयोजकांकडून सांगण्यात आले. यंदा या स्पर्धेत 25 हून अधिक रिक्षा आकर्षक अशा स्वरूपात पाहायला मिळाल्या. ही स्पर्धा आयोजित करणारे राजू जाधव यांनी याबाबत सर्व माहिती दिली आहे.
सौंदर्य स्पर्धेत सहभागी झालेल्यांपैकी काही ऐतिहासिक थीम, काही नवीन तंत्रज्ञानानी सुसज्ज अशा रिक्षा होत्या. ऐतिहासिक थीमवर असलेल्या रिक्षात छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज यांच्यासह गड किल्ल्यांचे फोटो आहेत. काही रिक्षांमध्ये गडकिल्ल्यांची माहिती देण्यात आली आहे. तर रिक्षावर बुरुज, कमानी आणि मावळ्यांच्या प्रतिकृती तयार केलेले आहेत. अंबाबाई देवीच्या मंदिराची प्रतिकृती रिक्षात बनवण्यात आली आहे. तसेच रिक्षाच्या आत मध्ये फॅन, आकर्षक अशी बैठक व्यवस्था, चालकाच्या समोर एलईडी स्क्रीन ठेवण्यात आली आहे.
रिक्षांचे चालक देखील त्यांच्या निरनिराळ्या स्टाईल मुळे चर्चेत असतात. कोल्हापुरातल्या या स्पर्धेत एक चालक त्याच्या रिक्षा चालवण्याच्या स्टाईलमुळे नेहमी चर्चेत असतो. या सौंदर्य स्पर्धेत तो रिव्हर्स रिक्षा चालवून चाहतांचं लक्ष वेधून घेत असतो. इतरही काही रिक्षा चालक या स्पर्धेत असतात जी आपल्या कलाकुसर सादर करत असतात.
ही रिक्षा सौंदर्य स्पर्धा पाहण्यासाठी इतरही जिल्ह्यातून चाहते येत असतात. आज ही स्पर्धा पाहण्यासाठी काही लोक खास पंढरपूर होऊन आलेले होते. यांना ही स्पर्धा फार आवडली. सोशल मीडियावरचे रील पाहून हे लोक कोल्हापुरात आलेले होते. अशा प्रकारच्या स्पर्धांमुळे महाराष्ट्रातल्या रिक्षाचालकांमध्ये एक समाधानाचं वातावरण तयार होतं अशी प्रतिक्रिया या चाहत्यांनी दिली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world