Sharad Pawar: गावकऱ्यांचा आक्रोश, संतोष देशमुखांचे कुटुंब भावुक, मस्साजोगमध्ये शरद पवारांनी काय शब्द दिला?

बीडचे खासदार बजरंग सोनवणे, आमदार संदीप क्षीरसागर, माजी मंत्री राजेश टोपे यांच्यासह सर्व स्थानिक नेते यावेळी उपस्थित होते. शरद पवार यांच्या या भेटीवेळी गावकऱ्यांनी संपूर्ण घटनाक्रम सांगत आमच्या राजाला न्याय द्या, अशी मागणी केली. 

जाहिरात
Read Time: 2 mins
बीड:

स्वानंद पाटील:

 बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. बीडचे खासदार बजरंग सोनवणे, आमदार संदीप क्षीरसागर, माजी मंत्री राजेश टोपे यांच्यासह सर्व स्थानिक नेते यावेळी उपस्थित होते. शरद पवार यांच्या या भेटीवेळी गावकऱ्यांनी संपूर्ण घटनाक्रम सांगत आमच्या राजाला न्याय द्या, अशी मागणी केली. 

शरद पवार काय म्हणाले? 

'जे काही घडलं ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील सर्व सामान्यांना एक प्रकारचा धक्का बसणारं आहे. बीड जिल्हा अनेक वर्षांपासून वारकरी सांप्रदायाचा  आहे. वारकरी सांप्रदायाचा विचार घेऊन आयुष्य जगणारा, महाराष्ट्राच्या साखर उद्योगासाठी कष्ट करणारा म्हणून बीडचा उल्लेख होतो. अशा जिल्ह्यामध्ये जे घडलं ते कोणाला न पटणारं आहे,' असं शरद पवार म्हणाले. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

'संतोष देशमुख 15 वर्ष सरपंच होते. वादविवादापासून दूर राहणारा लोकांच्या दैनंदिन, सुखःदुःखाशी सामना करणारा लोकप्रतिनिधी संतोष देशमुख म्हणून तो काम करत होता. जे घडलं त्याच्याशी त्याचा काहीही संबंध नव्हता. बाहेरुन आलेल्यांनी दमदाटी केल्यानंतर चौकशी केली, ती चौकशी केली म्हणून व्यक्तिगत हल्ला होतो अन् तो हत्येपर्यंत जातो हे पाहता प्रकरण गंभीर असल्याचे त्यांनी सांगितले. 

'सर्वांनी हा प्रश्न उचलून धरला. बजरंग सोनवणे यांनी हा मुद्दा उचलू धरला.  कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न संसदेच्या सभागृहात मांडला. या देशात, राज्यात काय चाललंय असे प्रश्न लोक विचारु लागले. त्यांनी एकच गोष्ट सांगितली सुत्रधार कोण याच्या खोलात गेले पाहिजे. त्यांचा सुसंवाद कोणाकोणाशी झाला, त्याच्या खोलात गेलं पाहिजे, सत्य जनतेसमोर आलं पाहिजे.  हेच चित्र राज्याच्या विधानसभेत दिसले. सर्वांनी हा प्रश्न मांडला. मी स्वतः माहिती घेतली. यावर मुख्यमंत्र्यांनी काही आश्वासने दिलीत. पण या कुटुंबाचे दुःख आहे.

(नक्की वाचा-  Success story: आधी नापास झाला मग यशाचा मानकरी ठरला! शेतकऱ्याच्या लेकानं काय केलं?)

'मुख्यमंत्र्यांनी मदत केली त्यावर टीका करणार नाही, मात्र याच्या खोलात जाऊन चौकशी व्हावी. खरा सूत्रधार कोण? त्याला तातडीने कठोर शिक्षा झाली पाहिजे. मी एवढेच सांगेन, दहशतीला सर्वांनी तोंड देऊ. आपण सर्वांनी भूमिका घेतल्यानंतर कोणीही अडवू शकत नाही. महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यामध्ये जे घडतंय त्याची केंद्र सरकारने दखल घ्यावी. संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी घेतो. तुझ्या शिक्षणाची जबाबदारी घेतो. त्यांच्या मातोश्रींनाही आधार देऊ.राज्य सरकार, केंद्र सरकार याच्या खोलात जाईल, तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही,' असा शब्दही शरद पवार यांनी दिला.