Saqib Nachan Death : मुंबई बॉम्बस्फोट (Mumbai Bomb Blast) प्रकरणातील मुख्य आरोपी इसिस दहशतवादी संघटनेचा म्होरक्या साकीब नाचन (Who is Saquib Nachan) याचा तुरुंगात मृत्यू झाल्याची मोठी बातमी समोर आली आहे. 24 जून रोजी रात्री ब्रेन हॅमरेज झाल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तो NIA च्या कस्टडीत दिल्लीत होता. दिल्लीतील दीनदयाळ रूग्णालयात त्याला दाखल करण्यात आलं होतं. यावेळी उपचारादरम्यान त्याचा (Saquib Nachan Death) मृत्यू झाला. सध्या ठाणे ग्रामीण पोलिसांचा मोठा बंदोबस्त पडघा (Padgha Model) गावाच्या बाहेर लावण्यात आला आहे.
ठाणे जिल्ह्यातील पडघा (Padgha Borivali) या गावाला साकिब नाचनचं गाव म्हणूनही ओळखलं जातं. पडघा गाव ठराविक एका जमातीसाठी ‘स्वतंत्र क्षेत्र' म्हणजेच सीरियाप्रमाणे ‘अल – शाम' म्हणून घोषित करण्यात नाचणचा प्रयत्न होता. या गावात काही दिवसांपूर्वी हत्यारं सापडली आहेत. साकिब नाचनला आतापर्यंत तीन वेळा दहशतवादी कारवायांसंदर्भात अटक झाली होती. त्याच्या या गावाभोवती कायमच संशयाचं वातावरण राहिलंय. मुंबईहून नाशिकला जाताना वाटेत पडघा नावाचं एक गाव लागतं. काय आहे हे पडघा मॉडेल.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
गावात दहशतवादी कारवाया?
मुंबई-नाशिक हायवेवरचं भिवंडीजवळचं पडघा (Padgha near Bhiwandi) नावाचं गाव आहे. सुमारे आठ हजार लोकवस्ती असलेल्या या गावात शिरताच उर्दू पाट्या दिसू लागतात. आणि त्यावरुनच अंदाज येतो हे मुस्लीम बहुसंख्य गाव आहे. गावात जवळपास 97 टक्के मुस्लीम वस्ती आहे. देशात एखादी दहशतवादी हल्ल्याची घटना घडली की बऱ्याचवेळा तपासाची सुई याच पडघा बोरीवली गावात येऊन पोहोचते. हे गाव पूर्वी लाकडांच्या वखारींसाठी ओळखलं जायचं. भिवंडीप्रमाणे इथेही गोदामं उभी राहिली. त्यामुळे जमिनीला चांगला भाव आला. त्यामुळे पहिल्यापासूनच गावात पैसा खुळखुळता राहिला. मात्र मुंबईतल्या 1990 च्या दशकातल्या साखळी बाॅम्बस्फोट प्रकरणात याच गावातल्या साकिब नाचनला अटक झाली. तेव्हापासून पडघा बोरीवलीची ओळख बदलली.
1970 मध्ये भिवंडी परिसरात दंगल झाली आणि त्यावेळी भिवंडीतल्या विविध भागांतून मुस्लीम नागरिकांनी याच पडघा बोरीवलीमध्ये स्थलांतर केलं. साकिब नाचण याच बोरीवली पडघा गावात जन्माला आला. साकिबला तीन वेळा अटक झाली. 1990च्या दशकातल्या बॉम्बस्फोटांप्रकरणी ‘टाडा' न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. पाच वर्षे तुरुंगात राहिल्यावर नाचणची सुटका झाली. पुन्हा 2002 आणि 2003 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी साकिबला अटक झाली. त्यावेळी तो ठाणे कारागृहात होता. नाचण याची वर्तणूक चांगली असल्यानं त्याची पाच महिने 13 दिवस आधीच सुटका केली होती. ठाणे कारागृहातून बाहेर पडताच, त्याला भेटण्यासाठी पडघ्यातल्या नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
साकिबला (Saqib Nachan Death at Delhi Hospital) जेव्हा अटक झाली, तेव्हा मार्च 2003 मध्ये प्रदीप शर्मा, दया नायक आणि सचिन वाझे हे तीन एन्काऊण्टर स्पेशालिस्ट साकिब नाचनला अटक करण्यासाठी पडघ्यात गेले होते. साकिबला पोलीस घेऊन जात असल्याचं कळताच ग्रामस्थ आक्रमक झाले. साकिबला पोलिसांच्या वाहनांमध्ये बसवल्यानंतर पोलिसांच्या पथकावर हल्ला झाला. त्यानंतर ग्रामस्थांनी साकिबला पोलिसांच्या गाडीतून बाहेर काढले. त्यामुळे पोलीस पथक रिकाम्या हातानं गावातून परतलं होतं. काही दिवसांनी मात्र साकिब नाचन पोलिसांना शरण आला होता.
काय आहे पडघा मॉडेल?
2017 मध्ये साकिब नाचनची (Saqib Nachan News) सुटका झाली. त्यानंतर तो पडघ्यामध्ये सक्रिय झाला आणि साकिबनं एक पडघा मॉडेल तयार केलं. साकिब नाचन हा बंदी असलेली दहशतवादी संघटना सिमीशी संबंधित होता. दहशतवादी संघटना आयसिसचे मोड्युल जसेच्या तसे पडघ्यात उभे करता येईल का याची चाचपणी नाचन करत होता. कट्टरतावादी विचारसरणीने साकिब नाचन स्थानिक तरुणांची माथी भडकवायचा. दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होणाऱ्या तरुणांना बयाथ म्हणजे ‘खलिफा'शी निष्ठेची शपथ दिली जायची. पडघा गाव ठराविक एका जमातीसाठी ‘स्वतंत्र क्षेत्र' म्हणजेच सीरियाप्रमाणे ‘अल – शाम' म्हणून घोषित करण्यात नाचणचा प्रयत्न असल्याचा संशय होता. पडघ्यातल्या स्थानिकांना तो दहशतवादी कारवायांचं प्रशिक्षण द्यायचा. दहशतवादी कारवायांसाठी स्थानिक पातळीवर छोटे गट तयार केले जायचे. गर्दीच्या ठिकाणांना लक्ष्य करुन जास्तीत जास्त नुकसान आणि भीती निर्माण करायचा प्लान पडघ्यामध्ये आखला जायचा. भिवंडीतील विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते मोहन रायचनी यांच्या हत्येचाही नाचन याच्यावर आरोप होता.
साकिब नाचनचा हस्तक सक्रिय...
2023 मध्ये साकिब नाचनला पुन्हा अटक झाली. तेव्हापासून तो तुरुंगात होता. साकिब तुरुंगात असताना त्याचे हस्तक पडघ्यामध्ये सक्रिय असल्याचा आरोप आहे. त्यामुळेच साकीब नाचणच्या घरासह तीस ते पस्तीस घरांवर एटीएसनं छापे टाकण्यात आले होते. या झडतीदरम्यान त्याच्या घरातून मोबाइल, तलवार, सुरा, मालमत्तेची संशयास्पद कागदपत्रं सापडली. साकिबचे काही नातेवाईक पंचायत समितीमध्ये सदस्यही असल्याची माहिती आहे.
या गावात कुणाचाही मृत्यू झाल्यावर कब्रस्तानात दफन केलं जातं, मात्र त्यासाठी ग्रामपंचायतीतून परवानगी घेतली जात नाही. या बोरीवली पडघा परिसरात गोवंश विक्रीसुद्धा मोठ्या प्रमाणात होते, असं स्थानिक सांगतात. साकिब नाचन याच्या मृत्यूचं वृत्त समोर आल्यानंतर पडघ्या गावातील सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. काही अघटित घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त वाढवला आहे.