राहुल तपासे, सातारा: रील बनवताना अति धोकादायक स्टंट करणं आणि त्यातून अपघात घडणं हे काही नवीन राहिलेलं नाही. यासंदर्भात सोशल मीडियावर आणि बातम्यांच्या माध्यमातून वारंवार ‘रीलबाजां'ना समजावण्याचा प्रयत्न होत असतो. मात्र, अशाच स्टंटबाजीमुळे साताऱ्यातील सडा वाघापूर परिसरात एक दुर्दैवी घटना घडली आहे.
सडा वाघापूर (Sada Vaghapur) हे ठिकाण साताऱ्यासह पश्चिम महाराष्ट्रात ‘उलट्या धबधब्या' साठी प्रसिद्ध आहे. पावसाळ्यात या धबधब्याचे पाणी उंचावर फेकले जात असल्याने हा एक वेगळा अनुभव देणारा निसर्गाचा चमत्कार मानला जातो. भव्य पठार, शेकडो पवनचक्क्या आणि निसर्गरम्य वातावरणामुळे पर्यटक मोठ्या प्रमाणावर येथे गर्दी करतात. मात्र, याच पठारावर काही पर्यटकांनी कारमध्ये बसून स्टंट करण्याचा प्रकार केला आणि त्याचा गंभीर परिणाम भोगावा लागला.
कार 200 फूट खोल दरीत कोसळली, गाडीत तिघे अडकले, मदतीला ते धावले अन्...
प्राथमिक माहितीनुसार, कारमध्ये तिघेजण होते व चौथा व्यक्ती मोबाईलद्वारे स्टंटचे चित्रीकरण करत होता. स्टंट करत असताना अचानक चालकाचा कारवरील ताबा सुटला आणि कार थेट दरीकडे झेपावली. कार अंदाजे १०० फुटांहून अधिक खोल दरीत गेली व झाडांच्या बुंध्यांमध्ये अडकली. त्या झाडांमुळेच कार अजून खोल दरीत कोसळण्यापासून थांबली.
या अपघातात कारमधील तिघेही गंभीर जखमी झाले. उपस्थित पर्यटकांनी आणि स्थानिकांनी धाडसाने कारजवळ जाऊन दरवाजे तोडून जखमींना बाहेर काढलं. कारचा दरवाजा उघडत नसल्याने प्रसंगावधान राखत शक्ती लावून दरवाजाच तोडावा लागला. जखमी युवक रक्तबंबाळ अवस्थेत होते. त्यांना तत्काळ खाजगी वाहनाने रुग्णालयात हलवण्यात आलं असून त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.
हा थरारक प्रसंग पाहून अनेक पर्यटक घाबरले, काहींच्या किंकाळ्या निघाल्या, तर काहींनी मदतीसाठी दरीच्या दिशेने धाव घेतली. विशेष म्हणजे, सडा वाघापूरच्या या धबधब्याच्या परिसरात नेहमीच मोठी गर्दी असते, मात्र याठिकाणी कोणताही पोलीस बंदोबस्त नव्हता. हा मोठा निष्काळजीपणा मानावा लागेल.
VIDEO : रीलच्या नादात कार दरीत कोसळली; 23 वर्षीय तरुणीचा मृत्यू
काही दिवसांपूर्वी सातारचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे पर्यटकांना आवाहन केलं होतं की, निसर्गाचा आनंद घेताना पर्यटनस्थळी मस्ती न करता काळजी घ्या, आणि जीवावर बेतणारे कोणतेही कृत्य करू नका. मात्र, या युवकांनी त्या सूचनेला दुर्लक्ष केलं आणि त्या स्टंटमुळे त्यांच्या जीवावर बेतण्याची वेळ आली. सुदैवाने तिघांचे प्राण वाचले असले, तरी काहींच्या शरीराचे अवयव मात्र निकामी झाले आहेत.
NDTV च्या माध्यमातून आम्ही सर्व पर्यटकांना विनंती करतो की, निसर्गाच्या सान्निध्यात गेल्यानंतर अति उत्साहावर नियंत्रण ठेवा. निसर्ग सौंदर्याचा आनंद घ्या, पण ‘थोडंसं वेड' हे जीवावर बेतू शकतं, हे लक्षात ठेवा.