राहुल तपासे, सातारा:
Satara Girl Kidnapping Case: बारावीची परीक्षा देणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध देऊन अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार सातारा जिल्ह्यामधून समोर आला आहे. मुलगी एक्स्ट्रा क्लाससाठी जात असताना हेल्मेट घातलेल्या दुचाकीस्वाराकडून लिफ्ट घेतल्यानंतर ती बेशुद्ध झाली. शुद्धीवर आल्यानंतर ती थेट पुणे येथे असल्याचे तिच्या लक्षात आले. स्थानिक व्यक्तीच्या मोबाईलवरून कुटुंबियांशी संपर्क साधल्यानंतर ती सुखरूप घरी परतली.
नेमकं काय घडलं?
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात एका अल्पवयीन विद्यार्थिनीच्या अपहरणाच्या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. बारावीची परीक्षा देणाऱ्या एका विद्यार्थिनीला गुंगीचे औषध देऊन तिचे अपहरण करण्यात आले आणि तिला थेट पुणे येथे सोडून देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना १४ फेब्रुवारी म्हणजेच 'व्हॅलेंटाईन डे'च्या दिवशी घडली असून पालकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
Shocking news: विधवा महिलेवर सलग 12 तास अत्याचार! एक- दोन नाही तर 'इतक्या' जणांनी तोडले लचके
आर्डे गावातील ही विद्यार्थिनी एक्स्ट्रा क्लाससाठी जात असताना एका हेल्मेटधारी दुचाकीस्वाराने तिला लिफ्ट दिली. मात्र, त्यानंतर तिला गुंगीचे औषध देण्यात आले असावे, असा संशय आहे. "लिफ्ट घेतल्यानंतर पुढे काय झाले, हे मला अजिबात आठवत नाही. जेव्हा मला शुद्ध आली, तेव्हा मी पुणे रेल्वे स्टेशन परिसरात होते," असे पीडित मुलीने सांगितले. प्रसंगावधान राखून तिने एका स्थानिक व्यक्तीच्या मोबाईलवरून आपल्या पालकांशी संपर्क साधला, त्यानंतर तिची सुटका झाली.
अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
याप्रकरणी मुलीचे वडील बाजीराव वारागडे यांनी मेढा पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने संशयिताचा शोध सुरू केला आहे. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशीच ही घटना घडल्याने हे केवळ अपहरण आहे की यामागे काही वेगळे षडयंत्र आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.