Success Story: जिद्द-चिकाटी, स्वप्नांची उंच भरारी! शेतकऱ्याची लेक झाली 'महसूल सहायक', माणदेशी कन्येचं MPSCत यश

दुष्काळी भागातील मुलांमध्ये गुणवत्ता असते, फक्त त्याला जिद्दीची जोड हवी, हेच मयुरीने आपल्या यशातून सिद्ध केले आहे. तिच्या या यशाबद्दल संपूर्ण जिल्ह्यातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Success Story: सातारा जिल्ह्यातील माण तालुका म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो कायमस्वरूपी दुष्काळ आणि पाचवीला पुजलेलं टंचाईचं संकट. मात्र, याच दुष्काळी मातीतील एका सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलीने आपल्या कतृत्वाने यशाची नवी पहाट फुलवली आहे. कासारवाडी (ता. माण) येथील कु. मयुरी रेखा राजाराम सस्ते हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात आलेल्या गट-क परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश संपादन करत मंत्रालय स्तरावर 'महसूल सहाय्यक' (Revenue Assistant) पदाला गवसणी घातली आहे. 

Success Story: कृषी सेवक ते सहाय्यक आयुक्त.. अकोल्याच्या लेकीची यशस्वी झेप; संघर्षातून मिळवलं यश!

माणदेशी कन्येची यशस्वी झेप! 

"परिस्थिती माणसाला हरवू शकते, पण जिद्दीला नाही..." असं म्हणतात. हेच वाक्य माणदेशातल्या शेतकरी कन्येन खरं करुन दाखवलं आहे. माण तालुक्यातील कासारवाडी गावच्या मयुरी सस्तेने एमपीएससी परीक्षेत यश मिळवत महसूल सहाय्यक' पद मिळवलं आहे.  ​मयुरीचे प्राथमिक शिक्षण मलवडी येथील जिल्हा परिषद शाळेत झाले, तर माध्यमिक शिक्षण त्रिंबकराव काळे विद्यालयात पूर्ण झाले. दहिवडी कॉलेजमधून बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने कृषी क्षेत्रात रस दाखवत रेठरे बुद्रुक येथील जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालयातून उच्च शिक्षण पूर्ण केले. घरी शेतीची पार्श्वभूमी आणि आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही मयुरीने प्रशासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते.

 आई वडिलांनी शिकवलं, लेकीने करुन दाखवलं! 

​२०२२ पासून ती कृषी अधिकारी आणि पीएसआय पदासाठी कसून सराव करत होती. याच प्रवासात तिने पहिल्यांदाच गट-क ची परीक्षा दिली आणि कोणत्याही विशेष मार्गदर्शनाशिवाय पहिल्याच प्रयत्नात यशाला गवसणी घातली. दुष्काळी भागातील मुलांमध्ये गुणवत्ता असते, फक्त त्याला जिद्दीची जोड हवी, हेच मयुरीने आपल्या यशातून सिद्ध केले आहे. तिच्या या यशाबद्दल संपूर्ण जिल्ह्यातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Advertisement

"आपलं ध्येय साध्य करण्यासाठी मेहनतीची तयारी ठेवली पाहिजे. मनात जिद्द अन् डोळ्यात क्षिजितापल्याड झेप घेण्याची इच्छा असेल तर कोणतेही स्वप्न अपूर्ण राहत नाही. अपयशाने खचून न जाता सातत्य अन् संघर्षाची तयारी ठेवल्यानेच हे यश मिळाले. आई-वडिलांच्या कष्टाचं चीज केल्याचं भाग्य लाभल्याने आनंद होत आहे," अशा भावना यावेळी मयुरी सस्तेने व्यक्त केल्या. 

Success Story: परंपरा जपली अन् स्वप्नही गाठलं! 7 वर्षे पदराआड राहून अभ्यास केला, थेट जज झाल्या, आता लोक...