खान्देशच्या राजकारणाचे भीष्म पितामह, अक्कलपाडा प्रकल्पाचे जनक; रोहिदास पाटील काळाच्या पडद्याआड

त्यांची अंत्ययात्रा उद्या सकाळी 11 वाजता त्यांच्या राहत्या घरापासून निघणार आहे. त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर एसएसव्हीपीएस कॉलेज देवपूर धुळेच्या मैदानावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Advertisement
Read Time: 4 mins
धुळे:

नागिंद मोरे, प्रतिनिधी

खान्देशच्या राजकारणातील भीष्म पितामह, अक्कलपाडा प्रकल्पाचे जनक, माजी मंत्री (Rohidas Chudaman Patil) दाजीसाहेब रोहिदास चुडामण पाटील (84) यांनी आज सकाळी 11 वाजता अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाचे वृत्त आज सकाळी खान्देशात वाऱ्यासारखे पसरले अन् संपूर्ण खान्देश शोकाकूल झाला. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवासस्थानी धाव घेतली होती. दरम्यान 28 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता एसएसव्हीपीएस महाविद्यालयाच्या मैदानात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

काँग्रेस पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा धुळे ग्रामीणचे आमदार यांचे ते वडील होत. गेल्या काही महिन्यांपासून दाजीसाहेबांची प्रकृती खालावली होती. गेल्या फेब्रुवारी महिन्यात ते आपल्या मुलीला भेटण्यासाठी कोल्हापूरला गेले असता त्यांची प्रकृती अचानक बिघडली होती. त्यामुळे त्यांना कोल्हापुरातील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात होते. त्यावेळी ते मृत्यूच्या दाढेतून सुखरुप परतले होते. त्यानंतर काँग्रेसचे नेते खा. राहुल गांधी हे भारत जोडो न्याय यात्रेनिमित्त धुळ्यात आले असता त्यांनी दाजीसाहेबांच्या निवासस्थानी जावून त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली होती.
 

इतकेच नव्हे तर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना फोन करून त्यांचेही दाजीसाहेबांशी बोलणे करुन दिले होते. त्यानंतर दाजीसाहेबांनी गेल्या 13 जुनला आपला वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. कुटुंबीयांसोबत गणेशोत्सवही त्यांनी आनंदात साजरा केला. मात्र, त्यांची प्रकृती त्यांना साथ देत नव्हती. आज सकाळी 11 वाजता धुळ्यातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

निधनाचे वृत्त जिल्ह्यात वाऱ्यासारखे सर्वदूर पसरले आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसह तालुकाभरातून ओघ त्यांच्या अंत्यदर्शनासाठी निवासस्थानाकडे सुरू झाला. माजी मंत्री स्व. रोहिदास चुडामण पाटील यांचे पार्थिव दर्शन नेहरु हौसिंग सोसायटी, देवपूर धुळे येथील सुंदर सावित्री सभागृहात उद्या सकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत घेता येणार आहे.

त्यांची अंत्ययात्रा उद्या सकाळी 11 वाजता त्यांच्या राहत्या घरापासून निघणार आहे. त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर एसएसव्हीपीएस कॉलेज देवपूर धुळेच्या मैदानावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दाजीसाहेबांनी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात प्रदीर्घकाळापर्यंत मंत्री म्हणून यशस्वीपणे कार्यभार सांभाळला होता. त्यांच्या अंत्यविधीसाठी राज्यातील काँग्रेससह सर्वपक्षीय नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

नक्की वाचा - Rohidas Patil : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रोहिदास पाटील यांचं निधन

राजकीय कारकिर्द...
रोहिदास पाटलांची राजकीय कारकिर्द खऱ्या एक अर्थाने 1972 पासून सुरु झाली. सन 1972 ला धुळे जिल्हा परिषदेवर सदस्य म्हणून ते निवडून आले. 1975 पर्यंत ते जिल्हा परिषदेचे सदस्य होते. त्यानंतर 1978 ते 2009 या कालावधीत ते तब्बल सातवेळा आमदार म्हणून निवडून आले. 1986 ते 1988 अशी दोन वर्षे ते महसूल मंत्री होते. जून 1991 ते नोव्हेंबर 1992 या कालावधीत ते कृषि व फलोत्पादन आणि रोजगार मंत्री होते. सप्टेंबर 1994 ते मार्च 1995 या कालावधीत त्यांनी पाटबंधारे मंत्री म्हणून यशस्वीपणे जबाबदारी सांभाळली.

एप्रिल 1995 ते ऑक्टोबर 1999 या कार्यकाळात ते विधानसभेत काँग्रेसचे प्रतोद होते. सन 1999 ते 2001 या कालावधीत गृहनिर्माण, पुर्नबांधणी व संसदीय कामकाज मंत्री बनले. तर 2001 ते 2002 या कालावधीत कृषी व पशुसंवर्धन मंत्री होते. शिवाय 19 फेब्रुवारी 2003 ते 28 जून 2004 मध्ये प्रदेश काँग्रेस प्रवक्ता म्हणून जबाबदारी सांभाळली. यासह 2003 पासून प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहण्यास सुरुवात केली. त्यांच्या कामगिरीवर नजर फिरविल्यास त्यांच्यातील अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे सहज दर्शन घडते. त्यांनी केवळ पदेच भूषविली नाहीत तर या पदांना पुरेपूर न्याय देत खान्देशच्या विकासात भर घालण्याचे मोलाचे काम केले.

नक्की वाचा - सरपंच-उपसरपंचांसाठी खुश खबर! मानधनात झाली घसघशीत वाढ, आता महिन्याला मिळणार...

अक्कलपाडा प्रकल्पाचे शिल्पकार...
ग्रामीण जनतेचे जीवन सर्वस्वी शेतीवर अवलंबून असते आणि शेतकऱ्यांची प्रगती साधायची असेल तर शेतीला पाणी मिळाले पाहिजे, ही बाब दाजीसाहेब जाणून होते. त्यामुळे त्यांनी सिंचन वाढविण्याच्या दृष्टीने पांझरा नदीवर अक्कलपाडा प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली. आज अक्कलपाडा प्रकल्प शेतकऱ्यांना पाणी पुरवितानाच धुळे शहराची तहानही भागवत आहे. दाजीसाहेबांनी गिरणा नदीवर डावा कालवा केला. यामुळे शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहचविणे सुलभ झाले. याखेरीज जवाहर वॉटर शेडही उभारले. त्यांच्या दूरदृष्टीमुळे आज हजारो एकर जमीन सिंचनखाली आली आहे. त्यांनी खान्देशच्या विकासासाठी दिलेल्या योगदानामुळे त्यांचे नाव इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंदविले गेले आहे. दाजीसाहेब आज आपल्यात नसले तरी आपल्या कार्यकर्तृत्वाने ते प्रत्येकाच्या मनात अजरामर राहतील.