मंगेश जोशी, जळगाव: जळगाव शहरापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असलेल्या आसोदा गावात अनेक भागांमध्ये 15 ते 20 दिवसांनी पाणीपुरवठा होत असून भर उन्हाळ्यात ग्रामस्थांना पाणीटंचाईमुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे. पंधरा ते वीस दिवसांनी पाणीपुरवठा होत असल्याने ग्रामस्थांना साठवून ठेवलेले पाणी हे पुरवावे लागत असून पाण्यात जंत होत असल्याने दूषित पाणी पिण्याची वेळ ही ग्रामस्थांवर आली आहे. तर गेल्या अनेक वर्षापासून गावातील काही भागांमध्ये ही पाण्याची समस्या गंभीर झाली असून याच पाण्याच्या समस्येमुळे गावातील मुलांना मुलीही देत नसल्याचा व गावातील अनेक सुना पाण्याच्या त्रासाला कंटाळून या शहराकडे गेल्याचा आरोप हा ग्रामस्थांकडून केला जात आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
जळगाव जिल्ह्यातील आसोदा हे गावशहरापासून अवघ्या सात ते आठ किलोमीटर अंतरावर आहे. मात्र या गावातील काही भागांमध्ये 15 ते 20 दिवसांनी पाणीपुरवठा होत असल्याने ग्रामस्थांना भर उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या तीव्र झळा सोसाव्या लागत आहेत. आसोदा हे गाव कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे जन्मगाव मात्र या गावातील अनेक भागांमध्ये गेल्या अनेक वर्षापासून पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन नसल्याने येथील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठा मनस्ताप हा सहन करावा लागत आहे. गावातील याच भीषण पाण्याच्या समस्येमुळे गावात मुली द्यायलाही कोणी तयार नसून पाण्याच्या त्रासाला कंटाळून गावातील सुनांनी गावाला निरोप देत शहराकडे वास्तव्यात गेल्या आहेत.
गावातील ज्या भागात पाण्याची भीषण समस्या आहेत त्याच भागात एकच सार्वजनिक नळ असून त्या ठिकाणीही पाण्यासाठी महिलांमध्ये वाद निर्माण होतो आणि याच प्रकारामुळे करत गावात अनेक जण मुली देणे पसंत करत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. तर पंधरा-वीस दिवसांनी पाणी येत असल्याने घरातील लहान भांडे पाण्याने भरून पाणी पुरवावे लागत आहे.
नक्की वाचा - 'फडणवीस 2034 पर्यंत मुख्यमंत्री', 'त्या' चर्चेला शिंदेंकडून एका वाक्यात उत्तर, टेन्शन वाढणार!
दरम्यान, आसोदा हे गाव पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघातील गाव असून आसोदा गावातील अनेक भागात दहा-बारा दिवसानंतर पाणीपुरवठा होतो हे मंत्री गुलाबराव पाटील यांनी देखील मान्य केले आहे मात्र आसोदा गावाची पाणीपुरवठा योजना ही 99% पूर्ण झाली असली तरी मात्र निधी अभावी या पाणीपुरवठा योजनेचे काम हे रखडले होते. पण आता पाणीपुरवठा योजनेसाठी निधी उपलब्ध करू देण्यात आल्या असून महिनाभरात चार दिवसाआड ग्रामस्थांना पाणी पिण्याचे आश्वासन गुलाबराव पाटील यांनी दिले आहे.