
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच पुढची दहा वर्ष म्हणजेच 2034 पर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहतील असा दावा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी (25 एप्रिल) केलं होतं. बावनकुळेंच्या या दाव्यावर मुख्यमंत्र्यांनी काहीही वक्तव्य केलेलं नाही. पण, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका वाक्यात त्यावर प्रतिक्रिया दिलीय. मात्र बावनकुळेंच्या दाव्यानंतर आधीच हेवेदावे सुरू असलेल्या महायुतीतील वातावरण आणखी चिघळण्याची शक्यता आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाले होते बावनकुळे?
देवेंद्र फडणवीस यांनी विकसित महाराष्ट्राचा संकल्प केला आहे. तो पूर्ण करण्यासाठी पुढील 9 वर्ष त्यांच्या नेतृत्त्वाची आवश्यकता आहे. देवेंद्र फडणवीस 2034 पर्यंत मुख्यमंत्री राहतील. कारण त्यांनी विकसित महाराष्ट्राचा रोडमॅप तयार केलाय. ते महाराष्ट्राचे आत्तापर्यंतचे सर्वोत्तम मुख्यमंत्री आहेत, असं बावनकुळे यांनी स्पष्ट केले होते.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या विषयावर पत्रकरांनी प्रतिक्रिया विचारली त्यावर त्यांनी 'शुभेच्छा' या एका शब्दात त्याला उत्तर दिलं.
2024 मधील विधानसभा निवडणुकांच्या दरम्यान भाजपने स्वबळाचे संकेत दिले होते. भाजपा नेते अमित शाह यांनी कार्यकर्त्यांशी बोलताना 2029 ची निवडणूक भाजपा स्वबळावर लढेल असं जाहीर केलं होतं. तेव्हापासून शिवसेना आणि भाजपामध्ये कुरबुरी सुरु झाल्या होत्या. एकनाथ शिंदे यांना विधानसभा निवडणुकीनंतर उपमुख्यमंत्री व्हावं लागलं. त्यावेळी दोन्ही पक्षांमधील दरी वाढायला लागली.
( नक्की वाचा : BJP vs MNS : राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंना टाळी! भाजपानं झटकले 'हात' BMC मध्ये काय घडलं? )
सर्वच पक्षांना चिंता
देवेंद्र फडणवीस यांना भाजप केंद्रात मोठी जबाबदारी देईल अशीही चर्चा अनेकदा होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रिटायरमेंटचा मुद्दा आला की फडणवीसांच्या प्रमोशनची चर्चाही होते. फडणवीसांनी या चर्चांना कधीही दुजोरा दिला नाही पण त्याचवेळी त्यांनी या चर्चांना नाकारलंही नाही.
गेल्या तीन विधानसभा निवडणूकांत भाजप सगळ्यात मोठा पक्ष म्हणून निवडून आला आहे. आता पुढच्या निवडणूकीत जर भाजप स्वबळावर सत्ता स्थापन करण्याची तयारी करत असेल तर चिंता एकट्या शिंदेनाच नाही, तर राज्यातील सगळ्याचं राजकीय पक्षांना वाटणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world