अमोल सराफ, बुलढाणा:
Lunar Eclipse 2026: आज (मंगळवार,3 मार्च) फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी वर्षातील पहिले चंद्रग्रहण होणार आहे. हे ग्रहण भारतात दिसणार असल्याने त्याचे धार्मिक नियम तसेच सुतक पाळणे आवश्यक आहे. या खग्रास चंद्रग्रहणामुळे राज्यातील अनेक मंदिरांमध्ये दर्शन बंद ठेवण्यात येणार आहे, तसेच काही मंदिरांमध्ये आरतीही बंद ठेवण्यात येणार आहे. या चंद्रग्रहणानिमित्त शेगाव श्री गजानन महाराज संस्थान दर्शनामध्ये मोठा बदल करण्यात येणार आहे.
गजानन महाराज मंदिर दर्शनात मोठा बदल
आज खग्रास चंद्रग्रहण असल्याने विदर्भची प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या संतनगरी शेगाव येथील भाविकांकरता दर्शनाकरता मोठा बदल करण्यात आला आहे. श्री दर्शनाकरिता श्रींचे मंदिर खुले राहील. मात्र भक्तांना जाळीमधून श्रींचे दर्शन घेता येईल. तसेच श्रींची सकाळ व माध्यान्हाची आरती होणार नाही. श्री मंदिर परिसरातील महाप्रसादालय आज बंद राहील.
Chandra Grahan 2026 : चंद्राला ग्रहण लागतं म्हणजे नेमकं काय होतं? सोप्या भाषेत 'ग्रहण' समजून घ्या
श्री मंदिर परिसर सोडून इतर सर्व ठिकाणची प्रसादालय ,अल्पपोहार कक्ष नेहमीप्रमाणे सुरू राहतील. श्रींचे दर्शनात जाताना आज सकाळी ६.४३ मिनिटांपासून ते सायंकाळी ६.४७ मिनिटांपर्यंत हार ,पान फुले नारळ प्रसाद सोबत नेऊ नये. मुख्य म्हणजे आज धुलीवंदनानिमित्त आनंद सागर अध्यात्मिक केंद्र अवलोकनार्थ बंद राहील असे देखील श्री गजानन महाराज संस्थान च्या वतीने सांगण्यात आले आहे.
परळीमधील मंदिर स्पर्श दर्शनासाठी बंद
परळी बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग म्हणून ओळखले जाणारे परळी येथील हे मंदिर खग्रास चंद्रग्रहण निमित्ताने निर्धारित वेळेत भाविकांसाठी स्पर्श दर्शनासाठी दुपारी तीन ते सायंकाळी सात वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती मंदिर प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
ग्रहण काळात मंदिरातील नियमित धार्मिक विधी नियमांनुसार पार पाडले जातील. भाविकांनी याची नोंद घेऊन दर्शनासाठी वेळेचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
पंढरपुरच्या विठ्ठल मंदीर दर्शनातही बदल
तीन मार्च रोजी होणाऱ्या खग्रास चंद्रग्रहणा निमित्त पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये दर्शनामध्ये वेळेत बदल करण्यात आले आहेत. यामध्ये ग्रहण काळात काही काळ दर्शन बंद राहणार आहे. तर धुपारती संध्याकाळी सात वाजण्या ऐवजी रात्री साडेनऊ वाजता होईल. सकाळी 11 चा महानैवैद्य देखील रात्री साडेनऊ वाजता दाखवला जाणार आहे. तर सकाळी महानैवेद्याला केवळ सुकामेवा दाखवला जाईल. ग्रहण काळात विठ्ठलास चंद्रभागेचे पाणी आणून स्नान घातले जाईल.
छत्रपती संभाजीनगरच्या वेरूळमधील बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर महादेव मंदिर मंगळवारी खग्रास चंद्रग्रहणामुळे दुपारी तीनपासून सायंकाळी सातपर्यंत दर्शनासाठी बंद राहील. ग्रहणाच्या कालखंडात मंदिराचे दरवाजे बंद ठेवण्याची परंपरा असल्याने मंदिर प्रशासनाने दर्शनाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यामुळे दुपारी ३:०० ते ७:०० या वेळेत भाविकांना गाभाऱ्यात प्रवेश किंवा दर्शन घेता येणार नाही. दरम्यान, ग्रहण सुटल्यानंतर सायंकाळी ६:४७ ते ७:०० वाजेपर्यंत मंदिराची स्वच्छता व विशेष शुद्धीकरण पूजा केली जाईल असे मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.