Chandra Grahan 2026 : ३ मार्च २०२६ रोजी वर्षातील पहिले पूर्ण चंद्रग्रहण लागणार आहे. भारतात सायंकाळी चंद्रग्रहण दिसणार आहे. या काळात चंद्र लाल रंगाचा दिसतो. त्यामुळे याला ब्लड मूनही म्हटलं जातं. अशात लोक चंद्रग्रहणाबाबत अनेक गोष्टी सर्च करीत आहे. चंद्रग्रहण काय आहे? ग्रहण काय असतं? चंद्र ग्रहण कसं लागतं? ग्रहण किती वेळा लागते?
चंद्रग्रहण म्हणजे काय?
चंद्र हा एक थंड आणि खडकाळ गोल आहे. त्याला स्वतःचा प्रकाश नसतो. तो सूर्याच्या प्रकाशामुळे चमकतो. जेव्हा पृथ्वी ही सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते आणि पृथ्वीची सावली चंद्रावर पडते, तेव्हा त्याला 'चंद्रग्रहण' म्हणतात.
चंद्रग्रहण कधी लागतं?
जेव्हा चंद्र पृथ्वीच्या दाट सावलीतून जातं, तेव्हा चंद्रग्रहण लागतं. ही घटना फक्त पौर्णिमेलाच घडू शकते.
प्रत्येक पौर्णिमेला चंद्रग्रहण का होत नाही?
चंद्राची कक्षा पृथ्वीच्या कक्षेपेक्षा साधारण ५ अंशांनी झुकलेली आहे. त्यामुळे बहुतेक वेळा चंद्र पृथ्वीच्या सावलीच्या वरून किंवा खालून जातो. जेव्हा चंद्र, पृथ्वी आणि सूर्य एकाच सरळ रेषेत येतात, तेव्हाच ग्रहण लागतं.
चंद्रग्रहणाचे प्रकार...
उपछाया चंद्रग्रहण (Penumbral): चंद्र पृथ्वीच्या फिकट सावलीतून जातो. हे साध्या डोळ्यांनी ओळखणे कठीण असते.
खंडग्रास चंद्रग्रहण (Partial): चंद्राचा काही भाग पृथ्वीच्या गडद सावलीतून जातो.
खग्रास चंद्रग्रहण (Total): संपूर्ण चंद्र पृथ्वीच्या सावलीत झाकला जातो. यावेळी चंद्र गडद लाल रंगाचा दिसतो.
ब्लड मून (Blood Moon) म्हणजे काय?
पूर्ण चंद्रग्रहणादरम्यान चंद्र लाल किंवा तांबूस रंगाचा दिसतो. पृथ्वीच्या वातावरणातून सूर्यप्रकाश जाताना निळा प्रकाश विखुरला जातो आणि फक्त लाल प्रकाश चंद्रापर्यंत पोहोचतो, म्हणून त्याला 'ब्लड मून' म्हणतात.
चंद्रग्रहण पाहणे सुरक्षित आहे का?
जेव्हा चंद्रग्रहण होते तेव्हा पृथ्वीच्या रात्रीच्या बाजूला असलेले कोणीही ते पाहू शकते. जवळजवळ ३५% ग्रहणे उपछायासारखी असतात, जी दुर्बिणीने देखील पाहणे खूप कठीण असते. उर्वरित ३०% ग्रहणे आंशिक असतात, जी डोळ्यांशिवाय पाहणे सोपे असते. शेवटचे ३५% किंवा त्याहून अधिक ग्रहणे पूर्ण ग्रहणे असतात. त्यामुळे सूर्यग्रहणाप्रमाणे चंद्रग्रहण पाहण्यासाठी कोणत्याही खास फिल्टरची किंवा चष्म्याची गरज नसते. तुम्ही ते उघड्या डोळ्यांनी सुरक्षितपणे पाहू शकता.
३ मार्च २०२६ च्या ग्रहणाची वेळ
सुरुवात: दुपारी ३:२० वाजता
पूर्णता (खग्रास स्थिती): संध्याकाळी ४:३४ ते ५:३३ पर्यंत
समाप्ती: संध्याकाळी ६:४८ वाजता
चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण यातील फरक:
सूर्यग्रहण तेव्हा होते जेव्हा चंद्र हा पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये येतो, तर चंद्रग्रहणाला पृथ्वी ही सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world