अमोल सराफ, प्रतिनिधी
Buldhana News : इराण, अमेरिका आणि इस्रायलमधील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता थेट सर्वसामान्यांच्या खिशावर आणि दैनंदिन जीवनावर होताना दिसत आहे. तीर्थक्षेत्रांवरही याचा परिणाम पाहायला मिळत आहे. तीर्थक्षेत्रांवरील प्रसादालयावर याचा मोठा फटका बसला आहे. कित्येक प्रसादालयात दिल्या जाणाऱ्या ताटातील पदार्थांची संख्या कमी करण्यात आली आहे. मात्र आता इंधनावरही याचा परिणाम पाहायला मिळत आहे. त्यामुळे या तीर्थक्षेत्रावर जात असाल तर पंपावर तुम्हाला खडखडाट पाहायला मिळू शकतो. बुलढाणा जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलची टंचाई जाणवत आहे. संत नगरी असलेल्या शेगावातील चित्र दुसऱ्या जिल्ह्यातून येणाऱ्या भाविकांचं टेन्शन वाढवणारं आहे.
पंपावर खडखडाट....
शेगाव शहरातील प्रमुख पेट्रोल पंपांवरील डिझेलचा साठा पूर्णपणे संपला आहे. पेट्रोलचा साठाही आज सायंकाळपर्यंत संपण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विशेषतः खामगाव रोडवरील प्रसिद्ध जगदगुरु राजेश्वर माउली पेट्रोल पंपावर इंधनाचा खडखडाट पाहायला मिळत आहे. इंधन उपलब्ध नसल्याने वाहनधारकांना रिकाम्या हाती परतावे लागत असून ऐन कामाच्या वेळी वाहने थांबल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या टंचाईबाबत पंप चालकाने 'भारत पेट्रोलियम' (BPCL) कडे वारंवार विचारणा केली आहे. मात्र, कंपनीकडून कोणत्याही प्रकारचा सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याचे चालकांचे म्हणणे आहे. शनिवारी सकाळी आरटीजीएस करून आणि डिझेल पुरवठा मागणी केल्यानंतरही आजपर्यंत डिझेल टँकर आला नसल्याचं पंपचालक देशमुख यांनी सांगितलं. पुरवठा साखळी विस्कळीत झाल्यामुळे नवीन साठा कधी उपलब्ध होईल, याबाबत अनिश्चितता कायम आहे.
नागरिकांचा संताप अनावर...
एकीकडे पेट्रोलियम मंत्रालयाने देशात इंधनाचा पुरेसा साठा असल्याचे स्पष्ट केले आहे. "घाबरून इंधनाचा साठा करू नका, पुरवठा साखळी सुरळीत आहे," असे आवाहन सरकारकडून करण्यात येत आहे. मात्र, सरकारी दावा आणि प्रत्यक्ष जमिनीवरील परिस्थिती यात मोठी तफावत दिसून येत आहे. अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले जात असले, तरी प्रत्यक्ष पंपांवर इंधन नसल्याने नागरिकांचा संताप अनावर होत आहे. इंधनाच्या कमतरतेमुळे शेतीची कामे आणि वाहतूक व्यवस्था कोलमडण्याची शक्यता आहे. प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन पुरवठा सुरळीत करण्याची मागणी होत आहे.