मनीष रक्षमवार, गडचिरोली
गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम आणि नक्षलग्रस्त धानोरा तालुक्यातून एक अत्यंत प्रेरणादायी अशी यशकथा समोर आली आहे. धानोरा येथील रहिवासी मल्लिक बुधवानी यांची कन्या, कुमारी शिफा बुधवानी, हिने तालुक्याची पहिली चार्टर्ड अकाउंटंट (C.A.) होण्याचा मान मिळवला आहे. अत्यंत खडतर आणि संघर्षमय प्रवासातून शिक्षण घेतलेल्या शिफाने हे यश संपादन करून केवळ आपल्या कुटुंबाचेच नव्हे, तर संपूर्ण तालुक्याचे नाव उज्वल केले आहे. तिच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
शिफाने आपले दुसरीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण गडचिरोली येथील कार्मेल अकॅडमीमध्ये पूर्ण केले. त्यावेळी तिला गडचिरोलीला ये-जा करत असताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. एकदा पांढरसळा गावाजवळ नक्षलवाद्यांनी झाडे पाडून रस्ता बंद केला होता, ज्यामुळे तिच्या शिक्षणात तात्पुरता व्यत्यय आला होता. त्या कठीण परिस्थितीत तिला गडचिरोलीतच तिच्या आत्याकडे थांबावे लागले होते.
या सर्व आव्हानांवर मात करण्यासाठी आणि तिला उत्तम शिक्षण देण्यासाठी, तिच्या वडिलांनी तिला महाबळेश्वर येथील १९४५ साली स्थापन झालेल्या एका नामवंत शाळेत प्रवेश दिला. विशेष म्हणजे, याच शाळेत बॉलिवूडचे प्रसिद्ध कलाकार रवीना टंडन आणि आमिर खान यांचेही शिक्षण झाले होते. सामान्य आर्थिक परिस्थितीतून आलेल्या शिफाचे आई-वडील ट्रेनने पुण्यापर्यंत प्रवास करत असत आणि तिथून टॅक्सी करून आपल्या मुलीला शाळेत घेऊन जात होते. आसपासचे श्रीमंत पालक आपल्या आलिशान गाड्यांमध्ये येत असतानाही, शिफाने कोणताही न्यूनगंड न बाळगता आपली जिद्द आणि आत्मविश्वास कायम ठेवला.
Shifa Budhwani
तिच्या मेहनतीचे फळ तिला दहावीत मिळाले, जिथे तिने ९८% गुण मिळवले आणि बारावीत ९२% गुण मिळवत मेरिट यादीत आपले स्थान पटकावले. त्यानंतर तिने सिंबायोसिस कॉलेज, पुणे येथून B.Com चे शिक्षण घेतले. B.Com करत असतानाच, तिने चार्टर्ड अकाउंटंट (CA) सारखी अत्यंत कठीण परीक्षा उत्तीर्ण केली.
आपल्या या नेत्रदीपक यशाबद्दल बोलताना शिफा अत्यंत भावुक झाली. ती म्हणाली, “माझे आई-वडील हेच माझे खरे परमेश्वर आहेत. त्यांच्या पाठिंब्यामुळेच हे यश मला मिळवता आले. माझ्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक अडचणीच्या वेळी त्यांनी मला धीर दिला आणि पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन दिले. आज मी ज्या उंचीवर आहे, त्याचे श्रेय पूर्णपणे त्यांनाच जाते.”
नक्षलग्रस्त भागातून आलेल्या एका मुलीने चार्टर्ड अकाउंटंटसारखी अत्यंत आव्हानात्मक परीक्षा उत्तीर्ण करत तालुक्याचे नाव उज्वल केल्याने सर्वत्र तिचे अभिनंदन होत आहे. शिफा बुधवानी आज अनेक युवक-युवतींसाठी एक प्रेरणास्थान बनली आहे.