सुनिल दवंगे
साई बाबांचे भक्त हे जगात परसले आहेत. ते त्या त्यांच्या दर्शनासाठी कुठे ही असले तरी वर्षातून एकदा तरी साईंच्या शिर्डीत येत असतात. बाबांचे दर्शन घेतात. त्यामुळे शिर्डीत वर्षाचे बारा महिने चोवीस काळ भक्तांची गर्दी पाहायला मिळते. काही भक्त हे मोठे दानशुर असतात. ते साई चरणी श्रद्धेपोटी मोठे दान चढवतात. यात देश विदेशातील भक्तांचा समावेश असतो. दक्षिण भारतातूनही मोठ्या प्रमाणात भक्त इथं येतात. उत्तर भारतातल्या भाविकांचा ओघ ही अलिकडच्या काळात वाढलेला आपण पाहिला आहे. त्यात आता छत्तीसगडच्या एक भक्ताने साई चरणी केलेल्या दानाची चर्चा आहे.
साईबाबांवरील अपार श्रद्धेने प्रेरित होऊन देश-विदेशातील भाविक विविध स्वरूपात साईबाबांच्या चरणी देणगी देत असतात. असेच एक दान छत्तीसगड राज्यातील दुर्ग येथील भक्ताने दिले आहे. त्या साईभक्ताचे नाव गितीका सहाणी आहे. त्या साईंच्या दर्शनासाठी छत्तीसगड येथून शिर्डीत आल्या होत्या. त्यांनी भक्तीपोटी साई चरणी सोन्याचे गुलाबाचे फूल अर्पण केले आहे. या सुवर्ण गुलाबाच्या फुलाचे वजन हे साधारण 13.100 ग्रॅम वजनाचे आहे. शिर्डीत आल्यानंतर त्यांना बाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं. त्यानंतर हे गुलाबाचे सुवर्ण फुल बाबांच्या पायावर चढवले.
13.100 ग्रॅम वजनाच्या या सोन्याच्या फुलाची किंमत 1 लाख 54 हजार 253 रूपये आहे. सुवर्ण गुलाब साईबाबांचे चरणी अर्पण केल्यानंतर साईबाबा संस्थानच्या वतीने देणगीदार असलेल्या गितीका सहाणी या साईभक्तांचा सत्कार करण्यात आला आहे. गेल्या काही वर्षात साई चरणी मोठ्या प्रमाणात दान दिलं जातं. यात देश विदेशातल्या भक्तांचा समावेश आहे. आता सहाणी यांनी दिलेल्या या दानाची चर्चा होत आहे. त्यांनी ही आपण साईंच्या भक्ती मुळे आणि श्रद्धेमुळे हे दान दिले असल्याचं सांगितलं आहे.