- शिर्डीच्या साई मंदिरात दररोज सत्तर हजारांहून अधिक भाविक साईबाबांचे दर्शन घेतात
- साईबाबा संस्थान ट्रस्टने 112 कोटी रुपये खर्चून 12 प्रतिक्षा हॉल असलेले नवे दर्शनरांग संकुल उभारले आहे
- सशुल्क VIP दर्शन पास भाविकांना स्वतंत्र रांगेतून प्रवेश देतो, पण गर्दीच्या काळात ही रांगही लांबच लांब होते
सुनिल दवंगे
शिर्डीच्या साई मंदिरात साईबाबांचं प्रत्यक्ष दर्शन घडावं, यासाठी वर्षभर भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते. देशाच्या कानाकोपऱ्यातून तसेच परदेशातून लाखो भाविक शिर्डीत दाखल होत असतात. वर्षाकाठी साधारण तीन कोटी भाविक साईचरणी नतमस्तक होतात. दररोज सरासरी सत्तर हजार भाविक साईसमाधीचं दर्शन घेत असल्याची माहिती साईसंस्थानकडून देण्यात आली आहे. सण-उत्सव, नाताळ, नववर्ष, गुरुपौर्णिमा आणि सलग सुट्ट्यांच्या काळात भाविकांची संख्या प्रचंड वाढते. या कालावधीत साईदर्शनासाठी पाच तासांपेक्षा अधिक वेळ लागतो, तर अनेकदा भाविकांच्या रांगा थेट रस्त्यापर्यंत पोहोचतात. भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी साईबाबा संस्थान ट्रस्टने 112 कोटी रुपये खर्चून अद्ययावत दर्शनरांग संकुल उभारले आहे. या संकुलामध्ये एकूण 12 प्रतिक्षा हॉल असून, त्यामध्ये एकावेळी सुमारे 20 हजार भाविक दर्शनासाठी थांबू शकतात. मात्र, गर्दीच्या कालावधीत नवीन आणि जुने सर्व प्रतिक्षा हॉल पूर्णपणे भरून जात असल्याचे चित्र दिसून येते. साईसंस्थानकडून भाविकांसाठी 200 रुपयांचा सशुल्क VIP दर्शन पास उपलब्ध करून देण्यात येतो. हा पास नवीन दर्शन कॉम्प्लेक्समधील प्रवेशद्वार क्रमांक सहा येथून दिला जातो. आधारकार्ड किंवा इतर वैध ओळखपत्र सादर केल्यानंतर कोणतीही शिफारस न घेता हा पास मिळू शकतो.
VIP पासधारक भाविकांना स्वतंत्र रांगेतून मंदिरात प्रवेश दिला जातो. मात्र समाधी मंदिरात पोहोचल्यानंतर सर्व रांगा एकत्र येत असल्याने, गर्दीच्या काळात VIP रांग देखील लांबच लांब होते. सामान्य गर्दीच्या दिवशी या योजनेचा भाविकांना मोठा लाभ होत असल्याचे दिसून येते. साईसंस्थानकडून ब्रेक दर्शन प्रणाली राबवली जात असून, यामध्ये भाविकांना कोणतीही रांग न लावता थेट साईदर्शन मिळते. मात्र, या व्यवस्थेबाबत सर्वसामान्य भाविकांना अद्याप पुरेशी माहिती नसल्याचं चित्र आहे. ही सुविधा प्रामुख्याने महत्त्वाच्या व्यक्ती, शासकीय सेवेतील उच्चपदस्थ अधिकारी, आयएएस–आयपीएस, आमदार-खासदार-मंत्री, मुख्यमंत्री कार्यालयाकडून शिफारस प्राप्त भाविक तसेच अनिवासी भारतीय यांच्यासाठी उपलब्ध आहे.
ब्रेक दर्शनासाठी 200 रुपयांचा VIP पास अनिवार्य असून, ठराविक वेळेत भाविकांना साईमंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत सोडण्यात येते. या प्रक्रियेदरम्यान मंदिरातील एका बाजूची दर्शनरांग काही काळासाठी थांबवली जाते. ब्रेक दर्शन व्यवस्था साईसंस्थानच्या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून राबवली जाते. यामध्ये दोन कर्मचारी आणि दोन सुरक्षा कर्मचारी प्रत्यक्ष कार्यरत असतात. दिवसभरात तीन वेळा ब्रेक दर्शन दिले जाते.
• सकाळी 9.00 ते 10.00
• दुपारी 2.30 ते 3.30
• रात्री 8.00 ते 8.30
ब्रेक दर्शनासाठी भाविकांची किमान 24 तास आधी नोंदणी आवश्यक आहे. जनसंपर्क कार्यालयामार्फत संबंधित भाविकांचे नाव, आधारकार्ड क्रमांक आणि मोबाईल नंबरच्या आधारे सत्यता तपासली जाते. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर साईसंस्थानकडून अधिकृत संदेश (SMS) पाठवला जातो. त्या संदेशाच्या आधारे शिर्डीत आल्यानंतर भाविकांना जनसंपर्क कार्यालयातून VIP ब्रेक दर्शन पास दिला जातो. भाविक दर्शन वेळेनुसार दर्शन पास घेवून येथिल प्रतिक्षालयात प्रतिक्षा करु शकतात. निर्धारित वेळेत सर्व ब्रेक दर्शन करणा-या भाविकांना एकत्र मंदिरात नेले जाते. साईबाबा समाधीचं दर्शन झाल्यानंतर त्यांना कपाळी गंध, साईतीर्थ देवून त्यांना सान्मानित करण्यात येते.
साईबाबांचे झटपट दर्शन किंवा व्हीआयपी आरतीला उपस्थित राहण्याची अनेक भाविकांची इच्छा लक्षात घेऊन साईसंस्थानने मार्च 2025 पासून नवीन योजना कार्यान्वित केली आहे. या योजनेनुसार, 10 हजार रुपये किंवा त्यापेक्षा अधिक देणगी दिल्यास दानशूर भाविकांच्या एक देणगी पावतीवर एकावेळी पाच जणांना झटपट दर्शन किंवा एक VIP आरती दर्शनाचा मान दिला जातो. यात भाविकांला कोणत्याही प्रकारची रांग लावावी लागत नाही. संबंधित देणगी पावतीवरचं दर्शन आरतीचा उल्लेख असल्यामुळे संबंधित प्रवेशव्दारातून त्यांना सरळ आत प्रवेश दिला जातो. या सुविधेमध्ये भाविकांना कोणतीही रांग लावावी लागत नाही. देणगी स्वीकारल्यानंतर साईसंस्थानकडून अधिकृत देणगी पावती दिली जाते, ज्यावर आरती दर्शनाची सुविधा नमूद असते.
भाविकांना सुलभ सेवा देण्यासाठी साईसंस्थानकडून ऑनलाइन व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे.
भाविकांनी https://online.sai.org.in/#/login या संकेतस्थळावर जाऊन मोबाईल क्रमांक व OTP किंवा ईमेल आयडीच्या माध्यमातून लॉग इन करावे. त्यानंतर वैयक्तिक माहिती, ओळखपत्र तपशील आणि ईमेल व्हॅलिडेशन पूर्ण केल्यानंतर विविध सेवांचा लाभ घेता येतो. यात भाविकाला शिर्डीत आल्यानंतर पासेससाठी कोणतीही रांग लावावी लागत नाही. आल्यानंतर ऑनलाइन दर्शन पासची पावती दाखवल्या बरोबर त्याला नविन दर्शन रांगेच्या प्रवेशव्दार क्रमांक सहा मधून प्रवेश दिला जातो. याशिवाय ज्या भाविकांना सामान्यपणे साईमंदिर दर्शन घ्यावयाचे असते त्यांना नवीन दर्शन रांग प्रवेशव्दार क्रमाक सहा मधून थेट प्रवेश दिला जातो. गर्दी कालावधी वगळता इतर वेळी साधारण एक तासात साईदर्शन होते.