किशोर बेलसरे, प्रतिनिधी
Shiv Bhojan Thali : राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या काळातील सगळ्यात लोकप्रिय उपक्रमांपैकी एक असलेली शिवभोजन थाळी (Shiv Bhojan Thali) बंद करण्याचा विचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. 'शिवभोजन थाळी' या उपक्रमाअंतर्गत राज्यातील अनेक भागांमध्ये अवघ्या दहा रुपयात अन्न उपलब्ध करून दिलं जातं. त्यामुळे भुकेल्यांना मोठा आधार मिळतो. मात्र हा उपक्रम बंद करण्यासाठी राज्य सरकारच्या पातळीवर प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीत या योजनेचा आढावा घेण्याच्या सूचना दिल्यात. त्यामुळे चालू आर्थिक वर्ष संपल्यानंतर ही योजना गुंडाळली जाण्याची चिन्ह आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
छगन भुजबळांचे मुख्यमंत्र्यांना पत्र...
राज्यातील गोरगरिबांना गरजेची शिवभोजन थाळी योजना पूर्ववत सुरू ठेवण्याकरता आज राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेले आहे. पुढील अर्थसंकल्पामध्ये शिवभोजन थाळी बंद करण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि हा निधी लाडकी बहीण योजनेत वापरण्यात येणार असल्याची चर्चा सुरू आहे.
नक्की वाचा - Marathi Language Policy : सरकारी कार्यालयांमध्ये आता मराठी भाषा अनिवार्य; राज्य सरकारचा मोठा निर्णय
छगन भुजबळ यांनी ही शिवभोजन थाळी योजना बंद करू नये यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. महाराष्ट्रात राज्यातील गोर गरीब गरजू दररोज दोन लाख थाळीचा आनंद घेतात. या थाळीसाठी वर्षाला 267 कोटी खर्च येतो. शासनाच्या दृष्टीने भुकेल्यांच्या पोटासाठी 267 कोटी हा खर्च नगण्य आहे. त्यामुळे गरीब आणि गरजू नागरिकांच्या सहानुभूतीपूर्वक विचार करून शिवभोजन थाळी योजना पूर्ववत सुरू ठेवावी अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे.