Eknath Shinde: राज्यात सत्तेचा अजब खेळ, भाजपापाठोपाठ शिवसेनेचाही AIMIM बरोबर युती, परळीत अक्रितच घडलं!

Shiv Sena Shinde Group Ally with AIMIM: राज्याच्या राजकारणात सध्या कोणता पक्ष कुणासोबत जाईल आणि कोणती नवी युती आकाराला येईल याचा नेम नाही.

जाहिरात
Read Time: 3 mins
Parli Municipal Council : परळीत सत्तेचा नवा पॅटर्न अस्तित्वात आला आहे.

आकाश सावंत आणि सागर जोशी, प्रतिनिधी

Shiv Sena Shinde Group and NCP Ajit Pawar Faction Ally with AIMIM:  राज्याच्या राजकारणात सध्या कोणता पक्ष कुणासोबत जाईल आणि कोणती नवी युती आकाराला येईल याचा नेम नाही. कधी काळी एकमेकांचे कट्टर वैरी मानले जाणारे पक्ष सत्तेसाठी आता एकत्र येत आहेत. अकोला जिल्ह्यातल्या अकोटमधील भाजप आणि एमआयएमच्या युतीची चर्चा ताजी आहे. आता बीड जिल्ह्यातील परळी नगर परिषदेतही तोच प्रकार पुन्हा घडलाय.

परळीमध्ये  एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांनी चक्क एमआयएमला (AIMIM) सोबत घेऊन आपला गट स्थापन केला आहे. या नव्या समीकरणामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून विरोधकांनी सत्ताधारी महायुतीवर टीकेची झोड उठवली आहे.

काय आहे परळीतील सत्तेचे गणित?

परळी नगर परिषदेत एकूण 35 नगरसेवक आहेत. या नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी आधीच अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय झाला आहे. आता नगर परिषदेत गट नेत्याची निवड करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने आपली ताकद एकत्र केली.

 या प्रक्रियेत त्यांनी एमआयएमच्या एका नगरसेवकाला आणि काही अपक्ष नगरसेवकांना सोबत घेतले आहे. या नव्या युतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे 16, शिवसेनेचे 2, एमआयएमचा 1 आणि 4 अपक्ष अशा एकूण 24 नगरसेवकांचा समावेश आहे. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष वैजनाथ सोळंके यांची या गटाचे नेते म्हणून निवड करण्यात आली आहे.

( नक्की वाचा : Akola News : अकोटचा AIMIM बरोबरचा'अनाकलनीय' प्रयोग भाजपाला झोंबला; 'त्या' आमदारावर होणार मोठी कारवाई! )

अकोटमधील युती तुटली पण परळीत नवी आघाडी

काही दिवसांपूर्वीच अकोट नगरपालिकेत भाजपने एमआयएमच्या 5 नगरसेवकांना सोबत घेऊन सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, या युतीवर सडकून टीका झाल्यानंतर आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक आमदारांची कानउघाडणी केल्यानंतर ही युती मोडीत निघाली. भाजपने तातडीने एमआयएमपासून फारकत घेतली. मात्र, अकोटचे प्रकरण शांत होत नाही तोच परळीत शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीने एमआयएमला सोबत घेतल्याने हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून राजकारण तापले आहे.

Advertisement

दानवे यांचा शिंदेंना थेट टोला

परळीत झालेल्या या नव्या युतीवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले आहे की, परळी नगरपालिकेत शिवसेना, एमआयएम आणि राष्ट्रवादीची झालेली युती पाहून आता तत्त्वांच्या गप्पा मारणे थांबवावे. 

राष्ट्रवादी नको म्हणता म्हणता आता तुम्ही थेट एमआयएमचे साथीदार झालात का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. सत्तेसाठी तुम्ही वैचारिक भूमिका सोडून दिल्याची टीकाही त्यांनी केली आहे.

Advertisement


या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली आहे. एकीकडे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी आम्ही एमआयएमला राज्यातून हद्दपार करू असे म्हटले आहे, तर दुसरीकडे अंबादास दानवे यांनी परळीतील ही युती म्हणजे शिंदेंचा ढोंगी धर्मवाद असल्याचे म्हटले आहे.

विशेष म्हणजे, या संपूर्ण प्रकरणावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याला काहीच माहिती नसल्याचे सांगत 'कोण एमआयएम?' असा उलट प्रश्न विचारून वेळ मारून नेली आहे. दरम्यान, एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी मात्र महायुतीची मजा घेत, हे लोक सत्तेसाठी आमच्या मागे फिरत असल्याचा टोला लगावला आहे.
 

Advertisement
Topics mentioned in this article