- शिवसेना शिंदे गटाच्या माजी आमदार निर्मला गावित यांना त्यांच्या घरा बाहेर कारने उडवले.
- निर्मला गावित गंभीर जखमी होऊन खासगी रुग्णालयाच्या ICU मध्ये उपचारासाठी दाखल.
- अपघाताचा घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून कार चालक घटनास्थळावरून ताबडतोब पळून गेला आहे.
शिवसेना शिंदे गटाच्या माजी आमदाराला एका कारने त्यांच्या घरा बाहेर उडवल्याची घटना समोर आली आहे. निर्मला गावित असं त्याचं नाव आहे. सोमवारी सायंकाळी नाशिकजवळ हा अपघात झाला. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. हा अपघात इतका भीषण होता की, त्यांना तातडीने एका खासगी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात (ICU) उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या घटनेमुळे हा अपघात आहे की घातपात याची चर्चा नाशिकमध्ये रंगली आहे.
घटनेचे सीसीटीव्ही फुटेज
माजी आमदार निर्मला गावित या सोमवारी संध्याकाळच्या सुमारास त्यांच्या निवासस्थानाबाहेर नातवासोबत फेरफटका मारत होत्या. त्यावेळी मागून आलेल्या एका भरधाव कारने त्यांना जोरदार धडक दिली. धडक दिल्यानंतर कार चालक घटनास्थळावरून लगेच फरार झाला. या घटनेचे संपूर्ण दृश्य परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. फुटेजमध्ये दिसते की, कारने गावित यांना अक्षरशः चिरडले आणि ती पुढे निघून गेली. उडवल्यानंतर त्या बोनेटवर आदळल्या. त्यानंतर त्या खाली पडल्या. त्याच अवस्थेत ती कार पुढे निघून गेली.
अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
या अपघातप्रकरणी निर्मला गावित यांच्या तक्रारीनुसार नाशिक येथील अंबड पोलीस ठाण्यात अज्ञात कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फुटेज पाहून ही घटना केवळ अपघात आहे की, तो जाणूनबुजून घडवण्यात आलेला कृत्य आहे, याबद्दल पोलीस सखोल तपास करत आहेत. प्राथमिक चौकशीनंतरच या घटनेचे स्वरूप स्पष्ट होईल. सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होत आहेत. त्याच वेळी हा अपघात झाल्याने वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत.
गावित यांचा राजकीय प्रवास
निर्मला गावित या माजी केंद्रीय मंत्री माणिकराव गावित यांच्या कन्या आहेत. त्यांनी इगतपुरी मतदारसंघाचे दोन वेळा प्रतिनिधित्व केले आहे. 2019 मध्ये त्यांनी काँग्रेस सोडून उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला होता. नुकतेच 28 मे 2025 रोजी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांच्यासोबत सुमारे 1 लाख महिला कार्यकर्त्यांनीही पक्षात प्रवेश केला होता. त्यांची मतदार संघात चांगली ताकद आहे.