सुनिल दवंगे, प्रतिनिधी
Shiv Sena vs Shiv Sena UBT: शिवसेना ठाकरे गटातील सहा खासदारांनी घेतलेल्या वेगळ्या भूमिकेमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी बंडखोर खासदारांविरोधात रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर आता याला सत्ताधारी शिवसेना शिंदे गटाकडून जशास तसे उत्तर देण्याची तयारी सुरू झाली आहे. शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या सुरक्षेसाठी सर्व शिवसैनिक ढाल बनून उभे राहतील, असा आक्रमक पवित्रा शिवसेनेचे संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी घेतला आहे.
ठाकरे गटाला जशास तसे प्रत्युत्तर देणार
खासदार भाऊसाहेब वाकचौरे मतदारसंघात परतल्यानंतर त्यांचे जंगी स्वागत केले जाणार असल्याचे आमदार अमोल खताळ यांनी जाहीर केले आहे. ठाकरे गटाने कोणत्याही भ्रमात राहू नये, असा इशारा देत खताळ म्हणाले की, खासदार वाकचौरे यांच्या विरोधात ठाकरे गटाने घेतलेल्या आक्रमक भूमिकेला आम्ही चोख प्रत्युत्तर देऊ.
वाकचौरे यांच्या पाठीशी शिंदे गटाचे शिवसैनिक अत्यंत ठामपणे उभे आहेत. जर कोणी त्यांच्या अंगावर येण्याचा प्रयत्न केला, तर त्याला शिंगावर घेण्याची ताकद आमच्यात आहे, आम्ही हातात बांगड्या भरलेल्या नाहीत, अशा तीव्र शब्दांत त्यांनी विरोधकांना सुनावले आहे.
( नक्की वाचा : Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंना मविआमध्येही मोठा धक्का? काँग्रेस आता 'या' भूमिकेवर ठाम; समोर आला मोठा प्लॅन )
संजय राऊत यांचा इशारा
या वादाची ठिणगी शिवसेना ठाकरे गटात पडलेल्या मोठ्या फुटीमुळे पडली आहे. पक्षाने व्हिप बजावूनही लोकसभेतील 6 खासदार महत्त्वाच्या बैठकीला अनुपस्थित राहिले होते. या खासदारांनी आपला स्वतंत्र गट स्थापन करण्याबाबतचे पत्र लोकसभा अध्यक्षांना दिल्याने ठाकरे गट प्रचंड आक्रमक झाला आहे.
या घडामोडींवर बोलताना खासदार संजय राऊत यांनी गंभीर इशारा दिला होता की, आता ही लढाई कोर्टासोबतच रस्त्यावरही लढली जाईल. यापुढे आमचे ऑपरेशन तुडवा सुरू होणार असून पक्षाशी बेईमानी करणाऱ्यांना सोडणार नाही, असे राऊत यांनी म्हटले होते.
(नक्की वाचा : Shivsena UBT: ठाकरेंची शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होणार होती? फुटीर खासदारांच्या पत्राने राजकीय वर्तुळात भूकंप )
बाळासाहेब ठाकरेंच्या आदेशाचा हवाला
संजय राऊत यांनी खासदारांच्या या भूमिकेवर तीव्र संताप व्यक्त करताना थेट बाळासाहेब ठाकरेंच्या जुन्या आदेशांची आठवण करून दिली. हे वर्ष शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे आणि याच वर्षात या खासदारांनी बेईमानी केली आहे, म्हणूनच शिवसैनिकांमध्ये मोठी चीड आणि संताप असल्याचे राऊत यांनी सांगितले.
जे पैशांसाठी पक्षाशी गद्दारी करतात त्यांना तुडवलेच पाहिजे, असे आदेश यापूर्वी बाळासाहेबांनीही दिले होते, असे सांगत राऊत यांनी आता संसदेत, कोर्टात आणि रस्त्यावर आरपारची लढाई लढणार असल्याचे स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर शिर्डी आणि अहमदनगर जिल्ह्यात शिवसेना विरुद्ध शिवसेना असा मोठा राजकीय संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world