अखिलेश शर्मा, प्रतिनिधी
Shiv Sena UBT Crisis: महाराष्ट्र राजकारणातून या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना यूबीटी पक्षाचे सर्व 6 बंडखोर खासदार दिल्लीत लोकसभा अध्यक्षांना भेटले असून त्यांनी एक खळबळजनक पत्र सादर केले आहे. शिवसेना यूबीटी पक्ष थेट काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा वरिष्ठ नेत्यांचा प्लॅन होता, म्हणूनच आम्ही ठाकरेंची शिवसेना सोडण्याचा मोठा निर्णय घेतला आहे, असा अत्यंत गंभीर आरोप या बंडखोर खासदारांनी केला आहे. या मोठ्या राजकीय घडामोडीमुळे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडाली आहे.
काय आहे पत्रात आरोप?
शिवसेना यूबीटी पक्षाचे सर्व 6 बंडखोर खासदार लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना भेटले आणि त्यांनी आपल्या स्वाक्षरीचे एक पत्र सादर केले. या पत्रात खासदारांनी म्हटले आहे की, शिवसेना यूबीटी हा पक्ष आपल्या मूळ विचारधारेपासून पूर्णपणे भरकटला आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते या संपूर्ण पक्षाचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण करण्याच्या तयारीत होते.
हा प्लॅन आम्हाला मान्य नसल्यानेच आम्ही पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही सर्व 6 खासदार आता शिवसेना शिंदे गटात विलीन होत असून लोकसभेत आमची बसण्याची जागा बदलून ती शिंदे गटाच्या खासदारांसोबत करण्यात यावी, अशी अधिकृत विनंती या पत्राद्वारे करण्यात आली आहे.
( नक्की वाचा : रात्रीचा तो व्हिडिओ कॉल आणि ठाकरे गटात खिंडार; एकनाथ शिंदेंनी 35 मिनिटांत अशी लिहिली बंडखोरीची स्क्रिप्ट )
असे झाले सर्व बंडखोर खासदार दिल्लीत गोळा
या संपूर्ण बंडखोरीसाठी सर्व बंडखोर खासदारांना वेगवेगळ्या ठिकाणांहून खासगी विमानाने दिल्लीत आणण्यात आले होते. 16 जून रोजी रात्री 1:30 वाजता नागेश पाटील आष्टीकर नांदेडवरून खाजगी विमानाने दिल्लीत पोहोचले. त्याच दिवशी संजय देशमुख आणि संजय जाधव हे देखील दुसऱ्या खाजगी विमानाने नांदेडवरून दिल्लीला आले.
शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे हैदराबादवरून खासगी विमानाने दिल्लीत दाखल झाले, तर संजय दिना पाटील आणि आमदार प्रताप सरनाईक हे 16 जूनच्या रात्री दिल्लीत पोहोचले.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः मुंबईवरून आधी जयपूरला गेले आणि तिथून पहाटे 3 वाजता दिल्लीत पोहोचले. खासदार ओमराजे निंबाळकर हे पुणे येथून श्रीकांत शिंदे यांच्यासोबत पहाटे 4:30 वाजता दिल्लीत दाखल झाले. या सर्व खासदारांची राहण्याची व्यवस्था नोएडा येथील एका हॉटेलमध्ये करण्यात आली होती.
( नक्की वाचा : 4 दिवसांत खेळ खल्लास! 13 जूनच्या गुप्त बैठकीपासून ते 17 जूनच्या बंडापर्यंत; Operation Tiger चा थरारक रिपोर्ट )
लोकसभा अध्यक्षांसोबत दोन टप्प्यात बैठक
दिल्लीत पोहोचल्यानंतर 17 जून रोजी सकाळी दोन टप्प्यात लोकसभा अध्यक्षांची भेट घेण्यात आली. सकाळी 7 वाजता श्रीकांत शिंदे आणि ओमराजे निंबाळकर यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. त्यानंतर सकाळी 10:20 वाजता ओमराजे निंबाळकर यांच्याव्यतिरिक्त उर्वरित 5 खासदारांनी लोकसभा अध्यक्षांची भेट घेऊन त्यांच्याकडे आपले पत्र सुपूर्द केले.
या भेटीनंतर सर्व खासदार वेगवेगळ्या ठिकाणी रवाना झाले. नागेश पाटील आष्टीकर चेन्नईमार्गे तिरुपती दर्शनासाठी गेले, भाऊसाहेब वाकचौरे वाराणसीला गेले, संजय देशमुख आणि संजय जाधव अयोध्येला गेले, तर संजय दिना पाटील मुंबईला आणि ओमराजे निंबाळकर पुणे येथे परतले आहेत.
20 जून रोजी होणार पुढील घोषणा
या संपूर्ण बंडखोरीनंतर आता 20 जून रोजी हे सर्व 6 बंडखोर खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अधिकृत भेट घेणार आहेत. या भेटीनंतर ते लोकसभा अध्यक्षांना कधी भेटले आणि त्यांनी नक्की कोणत्या कारणांमुळे उद्धव ठाकरे यांची साथ सोडली, याचा संपूर्ण तपशील आणि ते पत्र अधिकृतपणे जाहीर करणार आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world