शिवसेना शिंदे गटाने महाड विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार भरत गोगावले यांना उमेदवारी जाहीर केली आहे. भरत गोगावले यांनी आज उमेदवारी अर्ज देखील दाखल केला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना भरत गोगावले यांनी त्यांच्याकडील संपत्ती, शिक्षण याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.
भरत गोगावले यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात आठवी पास असल्याचे नमूद केले आहे. मात्र भरत गोगावले कोट्यवधींचे मालक असल्याचे प्रतिज्ञापत्रातून समोर आलं आहे.
(नक्की वाचा- आदित्य ठाकरे किती कोटींचे मालक? दागिने, शेअर्स, कार किती? वाचा सविस्तर)
भरत गोगावले यांची एकूण संपत्ती
भरत गोगावले यांची चल मालमत्ता 99 लाख 87 हजार रुपये आहे. तर त्यांच्या पत्नीच्या नावावर असलेली चल मालमत्ता 1 कोटी 74 लाख रुपये आहे. भरत गोगावले यांची अचल मालमत्ता 2 कोटी 26 लाख रुपये आहे. तर त्यांच्या पत्नीची अचल मालमत्ता 2 कोटी 29 लाख रुपये आहे.
भरत गोगावले यांच्या 320 ग्रॅमचे दागिने असून त्याची किंमत 24 लाख रुपये दाखवण्यात आली आहे. भरत गोगावले यांच्यावर 28 लाख रुपयांचे कर्ज आहे. तर त्यांच्या पत्नीच्या डोक्यावर 27 लाख रुपयांचे कर्ज आहे.
(नक्की वाचा- Maharashtra Election : बारामतीत पुन्हा 'पवार vs पवार'; काका-पुतणे विधानसभा निवडणुकीत आमने-सामने)
भरत गोगावले यांच्याकडे टोयोटा कंपनीची कार असून या कारची किंमत 52 लाख रुपये असल्याचे दाखवण्यात आले आहे. भरत गोगावले यांच्या बायकोच्या नावे 40 सीटर 3 बस आहेत. याशिवाय त्यांच्या नावावर दोन गाड्याही दाखवण्यात आल्या आहेत. यातील एक गाडी टी परमिटवाली आहे.